‘वनराई’चा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे – वनराईचे संस्थापक आणि जेष्ठ नेते डॉ. मोहन धारिया यांनी विकासाला नवी दिशा दिली. भविष्यातील संकटांवरील उत्तरे शोधण्यासाठी स्थापन झालेल्या वनराईचे कार्य कायम महत्वाचे राहणार आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. वनराई संस्थेच्या ३८ व्या वर्धापनदिन सोहळ्यात पवार बोलत होते. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर यावेळी उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त पर्वती पायथ्याजवळील वनराई कार्यालयाच्या प्रांगणात मृदा-जल-वन संवर्धनातून शाश्वत ग्रामविकास या संकल्पनेवर आधारित भव्य प्रतिकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन करताना पोपटराव पवार बोलत होते.
यंदाचे वर्ष डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. वनराईच्या पुढाकाराने हे वर्ष ‘जल-वन-मोहन’ वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रदर्शन रविवार दिनांक १४ जुलै पर्यंत सुरु राहणार आहे.
राजकीय इच्छाशक्तीशिवाय समाजामध्ये सकारात्मक बदल होऊ शकत नाही असे नमूद करून पवार म्हणाले की, ती राजकीय इच्छाशक्ती मोहन धारिया यांच्याकडे होती त्यांनी विकासाला नवीन दिशा दिली. भविष्यातील पाणी संकटाचा वेध घेऊन त्यांनी वनराईच्या माध्यमातून उत्तर शोधले. मलाही त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभले. धारिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी वनराईमार्फत केलेले कार्य समाजासमोर मांडण्याचा रवींद्र धारिया यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
देशातील पडीक जमिनी उत्पादनक्षम व्हाव्यात आणि देशाच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता वनराईच्या माध्यमातून शेतकर्यांना आजवर २ कोटीहून अधिक बिया व रोपांचे वाटप केले, तसेच जल-मृद संवर्धनासाठी वनराई बंधा-याची चळवळ उभारली. पाणलोट व्यवस्थापनाबरोबरच चराईबंदी, कु-हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम राबवला. ग्रामीण भागात १३ प्रशिक्षण केंद्र उभारुन शेतक-यापर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविले. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. यातूनच शाश्वत ग्राम विकासाची गंगा गावागावात वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा अशा विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्यागावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे ‘शहरातून खेड्याकडे’ स्थलांतर (Reverse Migration) घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. वनराईचे उपक्रम स्थानिक ग्रामस्थांचे गरज लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविले जातात, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.
मृदा-जल-वन संवर्धनातूनच शाश्वत ग्राम विकास शक्य आहे असे अमित वाडेकर यांनी सांगितले. त्याच संकल्पनेवर आधारित प्रदर्शन भरविण्यात आले. याला शालेय विद्यार्थ्यांसह पुणेकर नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली. याचबरोबर सामाजिक, राजकीय, कृषी, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण प्रदर्शन आणि स्नेहमेळाव्याला आवर्जून हजेरी लावली. पुणे, सातारा, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जालना अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील गावागावांतील कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वनराई कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती.
कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं या हेतूने ‘स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे’ दरवर्षी वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पहायला मिळल्या.
वनराईच्या प्रमुख उद्दिष्ठांनमध्ये ग्रामीण विकासाचे काम अग्रस्थानी आहे, यामध्ये प्रामुख्याने पाणलोट व्यवस्थापन, वृक्षलागवड, शाश्वत शेती, सामुहिक शेती, घनकचरा व्यवस्थापन,पशुधन विकास, शिक्षण व आरोग्यविषयक सोयी-सुविधा, महिला सक्षमिकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. वनराईचा गेल्या ३८ वर्षातील प्रवास यानिमित्ताने नागरिकांना पाहता आला