पुणे-दिवसा रिक्षा भाडे घेण्याच्या बहाण्याने बंद घरांची पाहणी करून घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलीसांनी अटक केली. अनिकेत भाऊराव गायकवाड (वय.२१, रा.नवी सांगवी) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी अब्दुल सय्यद (रा.खराडी) यांनी फिर्याद दिली आहे .याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.पोलिसांनी परिसरातील सुमारे २५० सीसीटिव्ही चित्रीकरणची पाहणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनें आरोपी रिक्षा चालकाला अटक केली. त्याच्याकडून रिक्षा जप्त केली आहे.अनिकेत गायकवाड हा मागील काही वर्षांपासून रिक्षा चालवितो. साथीदाराला प्रवाशी म्हणून बसवून गायकवाड शहरात ठिकठिकाणी भाडे घेऊन गस्त घालत होते. भाड्याच्या निमित्ताने दिवसा पाहणी करून रात्री बंद घरे फोडत होते. खराडी परिसरात राहणारे फिर्यादी १४ नोव्हेंबर रोजी घर बंद करून मदुराईला गेले होते. यादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांचे घर फोडून लॅपटॉप, परदेशी चलन आणि नोटा असा एकूण सव्वा दोन लाखांची घरफोडी केली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीषा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, प्रमोद हंबीर, पोलीस अंमलदार, दिलावर सय्यद, शिवा धांडे, विकास कदम यांच्या पथकाने केली.