मुंबई-आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरपर्यंत पायी वारी काढण्याची परंपरा महाराष्ट्रात दृढ आहे. याच परंपरेचा भाग शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक दिवस पायी वारीत सहभागी होणार आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये शरद पवार एक दिवस हा अलौकीक अनुभव घेतील. अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली आहे.शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी मुंबईतील ‘ सिल्व्हरओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती.
शरद पवार यांच्यासोबत या वारीमध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर हे देखील या वारीत सहभागी होणार आहेत.
पंढरपुरपर्यंत पायी जाणाऱ्या पालखी वारीचा सर्वांना अनुभव यावा यासाठी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबविला जात आहे. यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. संत तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती.