टेनिस संघटनेचा महिला प्रशिक्षकांचा पुरस्कार रोहिणी लोखंडे यांनी पटकावला
नवी दिल्ली, 4 जून 2024: दिल्लीचे अनुभवी टेनिस प्रशिक्षक नरसिंग यांना अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या प्रतिष्ठेचा दिलीप बोस पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रशिक्षकंसाठी जीवन गौरव पुरस्कार असे या सन्मानाचे स्वरूप आहे. भारताच्या डेव्हिस कप संघाचे 1949 मध्ये प्रतिनिधित्व केल्यावर दिलीप बोस यांनी निवृत्तीनंतर प्रशिक्षक व प्रशासक म्हणून कारकीर्द गाजवली होती.
अखिल भारतीय टेनिस संघटने(एआयटीए)चे महासचिव अनिल धूपर यांनी नरसिंग यांच्या पुरस्काराची घोषणा करतानाच महिला प्रशिक्षकांसाठी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराचीही घोषणा केली. महाराष्ट्राच्या रोहिणी लोखंडे यांना बहुमान देण्यात आला. चांदीचे स्मृती चिन्ह आणि 50000रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे 7 व 8 जुन रोजी अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांनी आयोजित केलेल्या अकराव्या राष्ट्रीय प्रशिक्षक कार्य शाळेच्या दुसऱ्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. देशभरातील 150हून अधिक प्रशिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार असून आधुनिक तंत्रज्ञान आणि संबंधित सेवांची उपयुक्तता या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या सहभाग व प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ मिगेल क्रेस्पो हे मुख्य वक्ते असणार आहेत.
65 वर्षीय नरसिंग हे भारतातील सर्वात अनुभवी प्रशिक्षकांपैकी एक असून त्यांनी 1986 ते 2018 दरम्यान दिल्ली टेनिस संघटनेचे संचालक व मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी टेनिस संघटनेच्या राष्ट्रीय प्रशिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 2008 ते 2021 दरम्यान टेनिस सगण्टनेच्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या योजनेत त्यांनी प्रशासकीय भूमिका बजावली. गेल्या तीन दशकांपासून विविध देशांमध्ये झालेल्या स्पर्धांसाठी त्यांनी भारतीय कुमार संघांचे प्रवासी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली.
69 वर्षे वयाच्या रोहिणी लोखंडे यांनी तरुण वयात भारत श्रीलंका यांच्यातील लढतीत किरण बेदी, निरुपमा मंकड, सुसान दास आणि उदया कुमार यांच्यासह सहभाग घेतला होता. वयाच्या केवळ 17वर्षी प्रशिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या रोहिणी लोखंडे या भारतीय क्रीडा प्राधिकरण पतीयाळा या संस्थेच्या पहिल्या महिला अधिकृत प्रशिक्षक होत्या.
तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी विविध वयोगटातील 5000हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण दिला आहे एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या तर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षकांसाठीच्या परीक्षा व चाचण्या साठी पात्र ठरण्याकरिता त्यांनी असंख्य खेळाडूंना साहाय्य केले आहे. इतकेच नव्हे तर अनेक दिव्यांग व मतिमंद खेळाडूंना टेनिस प्रशिक्षण देताना त्यांनी प्रशिक्षक या संस्थेचे क्षितिज विस्तारले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाचा गौरव संघटनेने पहिला महिला जीवन गौरव पुरस्कार देऊन केला आहे.