रावसाहेब दानवे – जालना
पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला. काँँग्रेसच्या कल्याण काळेंनी त्यांंना पराभूत केले आहे.2019ला तब्बल 3 लाख 30 हजार मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे 2024 च्या निवडणुकीत सुमारे एक लाखांंच्या हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव जालन्याच्या निवडणुकीवर दिसून आला .जरांगे पाटलांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी या निवडणुकीत 1लाखापेक्षा जास्त मतं घेतली आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं सांगितले जाते.
डॉ. भारती पवार – दिंडोरी
मतमोजणीच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत बोलताना भारती पवार यांनी एक लाखांच्या फरकाने माझा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता पण दिंडोरीच्या मतदारांनी तेवढ्याच मतांनी भारती पवार यांचा पराभव केला आहे.भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी सुमारे 1 लाख मतांनी विजय मिळवला आहे.या मतदारसंघासाठी कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा होता. तोच मुद्दा या मतदारसंघात गाजल्याचा पाहायला मिळालं.
कपिल पाटील – भिवंडी
2021मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेल्या कपिल पाटील यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांची निवड करण्यात आली होती.2024च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी दिली आणि ही निवडणूक रंगतदार बनली.अखेर बाळ्यामामांनी कपिल पाटील यांचा सुमारे 80 हजार मतांनी पराभव केला आहे.
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
2019च्या निवडणुकीत काँग्रेसने फक्त एक जागा जिंकली होती. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता.30 मे 2023ला बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि 2024मध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केली.भाजपने या ठिकाणी राज्यात वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. खरंतर उमेदवारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची स्वतःची इच्छा नसतानाही त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याचं सांगितलं होतं.काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.
हीना गावित – भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आणि दोनवेळा नंदुरबारच्या खासदार राहिलेल्या हीना गावित यांनाही या निवडणुकीत पराभवाचा झटका बसला आहे.बहुतांश एक्झिट पोल्सनी नंदुरबारमध्ये हीना गावीतच विजयी होतील असा अंदाज वर्तवला होता पण अक्कलकुव्याचे आमदार आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.हीना गावित यांना गोवाल पाडवी यांच्याकडून 1 लाख 59 हजार120 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.
बीड- पंकजा मुंडे-राज्यातील सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीडमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
मुंबई उत्तर मध्य- उज्ज्वल निकम
राज्यातील एक लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. सुरुवातीला उज्ज्वल निकम यांचे जवळपास 52 हजार मतांचं लीड वर्षा गायकवाड यांनी भेदलं आणि विजय मिळवला.
बारामती – सुनेत्रा पवार
संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुप्रिया सुळे यांनी जवळपास एक लाखाहून जास्त मतांनी निवडून आले.
अमरावती – नवनीत राणा
राज्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला आहे.
धुळे- सुभाष भामरे
केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी त्यांचा पराभव केला.
पुणे- रवींद्र धंगेकर
पुण्याच्या मोठ्या लढतीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.