कॉंग्रेसला पूरक वातावरण असतानाही खेचून आणला विजय
धंगेकर यांना एकमेव पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाने दिली साथ
पुणे- संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा विरोधी , मोदी विरोधी वातावरण असतानाही पुणे शहराचे सार्वजनिक सुविधांचे नियोजन कोलमडलेले असतानाही माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय धंगेकर यांच्या सारख्या जनप्रिय उमेदवाराचा पराभव करून होणे हे विशेष मानावे लागणार आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वीपासून ,उमेदवारी घोषित होण्यापूर्वीपासून विरोधी वातावरणात देखील लोकसभा लढण्याची तयारी मोहोळ यांनी केली होती . त्यांना पुनीत बालन यांच्या सारख्या मित्राची मोठी साथ मिळणे आणि या दोहोंनी कॉंग्रेस सह अन्य विरोधी पक्षातही आपापले स्नेही जोडून आखलेली रणनीती आणि नियोजन यामुळे १ लाख २३ हजार मताधिक्याने मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला . धंगेकर यांना आपल्याच वर्तुळातील खूपच जवळच्या विश्वासू मित्र मंडळीच्या डोक्यात शिरलेल्या हवेने पराभव पत्करावा लागला .
पुणे लोकसभा मतदारसंघ अंतिम निकाल
मुरलीधर मोहोळ (भाजप) – 584171
रवींद्र धंगेकर – ( काँग्रेस) – 461409
मुरलीधर मोहोळ 1 लाख 22 हजार 762 मतांनी विजयी
मंडईमध्ये हमाली करणाऱ्या किसान मोहोळ यांच्या मुलाची वेगवान राजकारणी झेप
कुस्तीपटू, भाजपच्या बूथ स्तरापासून काम करणारा कार्यकर्ता ते स्थायी समिती अध्यक्ष नंतर लागेच महापौरपद भूषविलेले मुरलीधर मोहोळ आता थेट खासदार म्हणून संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुठा गावातून पुण्यात येऊन स्थिरावल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.मोहोळ यांचे वडील नोकरीनिमित्ताने पुण्यात आले. सुरुवातीला त्यांनी मंडईमध्ये हमाली केली. त्यानंतर एका बँकेमध्ये सेवक म्हणून कार्यरत होते. मुरलीधर मोहोळ यांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण मुठा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण भावे हायस्कूल टिळक रस्ता येथे घेतले. याच काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ रसवंतीगृह सुरू केले होते. तेथे ते वडिलांना मदत करत. पुढे उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले. तेथे पदवीचे शिक्षण घेतले. कुस्तीची आवड असल्याने कोल्हापूर येथे आखाड्यात प्रशिक्षण घेतले. या वेळी त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी चमक दाखवली. शिक्षण संपल्यानंतर पुन्हा पुण्यात आल्यानंतर श्री साई मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव कार्यकर्ता म्हणून काम केले. त्याचवेळी भाजपचे काम करताना जय भवानीनगर, केळेवाडी भागाचा बूथप्रमुख म्हणून काम केले.
■ २००२ : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड
■ २००६ : महापालिकेच्या पोटनिवडणुकीत नगरसेवकपदी संधी
२००७ ते २०१२, २०१७ ते २०२२ नगरसेवक
■ ■ २००९ : खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला
■ २०१७ : पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष तब्बल दोन अर्थसंकल्प मांडले
■ तब्बल अडीच वर्षे पुण्याचे महापौरपद भूषविले • सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत
सुरुवातीच्या काळात महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र होते. परंतु राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेने चुरस निर्माण झाली होती. मोहोळ यांना ५ लाख ८४ हजार , तर धंगेकर ४ लाख ६९ हजार मते मिळाली. परंतु मतांचा टक्का वाढविण्यात भाजपला यश आलेले नाही. याउलट कॉंग्रेसचा टक्का वाढला गेल्या दोन निवडणुकांत भाजपच्या मतांची संख्या पावणेसहा लाख ते सवा सहा लाखापर्यंत गेली होती, तर कॉंग्रेसची मते तीन लाखांपर्यंत होती. २०१९ च्या तुलनेत या निवडणुकीत भाजपची मते ४८ हजारांनी घटली, तर कॉंग्रेसच्या मतात दीड लाखाने वाढ झाली आहे.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाने दोन्ही निवडणुकांत भाजपचे कमळ फुलविले. परंतु यंदा या मतदारसंघाने धंगेकर यांना ‘हात’ दिला. दोन निवडणुकांत भाजपकडे गेलेला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार यंदा पुन्हा आपल्याकडे वळविण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळेच या एकमेव मतदारसंघातून धंगेकर यांना १२ हजारांचे मताधिक्य मिळाले, तर सोसायट्यांबरोबरच वस्ती आणि झोपडपट्ट्यांचा शिवाजीनगर मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून मोहोळ यांना अवघे साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळाले. यापूर्वी याच मतदारसंघाने भाजपला तीस ते पन्नास हजार मताधिक्य दिले होते. या निवडणुकीत मात्र वस्ती विभागाविरुद्ध सोसायट्यांचा भाग असे मतविभाजन झाल्याने मोहोळांना साडेतीन हजाराच्या माताधीक्यावर समाधान मानावे लागले. कोथरूडपाठोपाठ गेल्या दोन निवडणुकांत वडगावशेरी मतदारसंघाने भाजपच्या उमेदवाराच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. तीच परंपरा कायम ठेवत या मतदारसंघाने मोहोळ यांना मताधिक्य दिले.