डॉ. विनोद तावरे हे मंत्र्याच्या जवळचे असल्याने त्यांना पद मिळाले आहे. त्यामुळे तुमच्यावर दबाव आला तरी, तुम्ही दबावाला बळी पडू नका, असे आपण ससून रुग्णालयाच्या डीन यांना सांगितले असल्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. आमदार धंगेकर यांनी डीनची भेट घेत या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याणीनगर मधील अल्पवयीन आरोपीने केलेल्या कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन 17 वर्षीय आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर , शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए ए पांडे यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायलयाने आरोपींना 30 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. तावरे रात्री दोन वाजता ब्लड रिपोर्ट बदलतो. हे किती भयानक आहे. रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाली आहे, हे आता स्पष्ट झाले असल्याचेही आमदार धंगेकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, “ससून रुग्णालयातील डीनची मी आज भेट घेतली. या प्रकरणात त्यांच्यावर कुणाचाही दबाव आला, तर त्याला बळी पडू नका, असे मी त्यांना सांगितले आहे. कारण आता हा संपूर्ण समाजाचा विषय आहे, हा देशातील नागरिकाचा विषय आहे. लवकरात लवकर तुम्ही चौकशी पूर्ण करून अहवाल द्यावा, अशी मागणी देखील त्यांच्याकडे केली असल्याची महिती आमदार धंगेकर यांनी दिली. चुकीच्या माणसाला शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी विनंती आपण त्यांना केली असल्याचे आमदार धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
एक कर्मचारी फरार
दरम्यान या प्ररकणात आणखी एक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाला आहे. या फरार कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक चौकशीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. मात्र, त्याआधीच सदरील कर्मचारी फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.