पिंपरी, पुणे (दि. २७ मे २०२४) जागतिक पातळीवर औद्योगिक क्षेत्रामध्ये मंदीची लाट असतानाही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने मिळवून देण्यात आल्या आहेत.
पीसीईटी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील १,५०० विध्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सुमारे १,०५५ नोकऱ्या मिळाल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी पुढील सहा महिन्यात अनेक नोकरी मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती पीसीईटी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या वर्षी आतापर्यंत १०५५ विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या आयटी व कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपनीमध्ये झाली आहे. यामध्ये ॲक्सेंचर (१६८), कॅपजेमिनी (१०५), केपीआयटी (१०२) या कंपन्यांचा समावेश आहे. तर रोजगाराच्या संधी दिलेल्या आयटी प्रॉडक्ट कंपन्या वेरीटास, बीएमसी, सहज सॉफ्टवेअर, एसएपी या कंपन्या आहेत. कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमध्ये मर्सिडीज बेंझ, डसॉल्ट सिस्टिम्स, गोदरेज, मिंडा, किर्लोस्कर या नामांकित कंपनी आहेत. पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट सेल दर वर्षी विध्यार्थ्यांना सुमारे २५० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करीत असते.
या वर्षी पीसीईटी ग्रुपच्या २४० विध्यार्थ्यांना ७ लाखापेक्षा अधिक; ५६७ विद्यार्थ्यांना ५ लाख ते ७ लाख ; १८१ विद्यार्थ्यांना ३.५ लाख ते ५ लाख आणि ६७ विद्यार्थ्यांना ३.५ लाखापेक्षा कमी वार्षिक पगाराच्या नोकऱ्या विविध कंपन्यांमध्ये मिळाल्या आहेत.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयु चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी, डॉ. विलास देवतारे, डॉ. अपर्णा पांडे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व शिक्षक यांनी केले व शुभेच्छा दिल्या.