मराठवाडा मित्र परिवाराचा आदर्श माता पिता सन्मान सोहळा संपन्न
पुणे, २५ मे २०२४ : “आपल्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये आपल्या आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. सद्गुणी पालकांमुळेच या विश्वात एक चांगला माणूस घडतो. मी ज्ञानोबा तुकोबांचा भक्त असून शिवरायांचा खऱ्या अर्थाने पाईक आहे. शहाजी जिजाऊंच्या शिकवणीमुळेच शिवराय रयतेचे राजे होऊ शकले. म्हणूनच शहाजी जिजाऊंसारखे पालक व्हा!” असे विचार एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले. मराठवाडा मित्रपरिवार आयोजित एमआयटी कोथरूड येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आदर्श माता पिता सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, अँटी करप्शन चे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, माऊली ग्रुप कंपनीचे चेअरमन श्रीकांत शेळके, डायना बायोटेक कंपनीचे चेअरमन डॉ. विनोदकुमार पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. महेश थोरवे व डी. एम. व्ही. इंडिया ग्रुपचे चेअरमन दत्ताजी मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रतिकूल परिस्थितीतून ज्यांनी कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं अशा यशवंत मुलांना घडवणाऱ्या मराठवाड्यातील आदर्श माता-पित्यांचा सन्मान विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते संपन्न झाला. कांताबाई व धनराज दाताळ, कांताबाई श्रीनिवास पाटील, सुजाता व दत्तात्रय शिंदे, साखरबाई विष्णुपंत थोरवे, अनिता कचरू गोदामगावे, मीना व कर्ण पाटील, सुमन व किसनराव पवार, कमल व ज्ञानदेव भांडवलकर, सुनिता व महादेव नारायणपुरे, मदन गोपीनाथ शिंदे या आदर्श माता पितांना स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील विश्वशांतीच्या अखंड कार्याबद्दल ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी तर्फे मानद डिलीट मिळाल्याबद्दल विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा मराठवाडा मित्र परिवारातर्फे मानपत्र वाचन व मानपत्र अर्पण करून विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. विश्वनाथ. दा. कराड म्हणाले ” मातृदेवो भव, पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. आपल्या माता पित्यांच्या संस्कारामुळेच चांगले आयुष्य घडत असते. त्याग आणि समर्पण हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त व्हावा म्हणून अशा आदर्श माता-पित्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. आपल्या आई-वडिलांना नेहमीच आदराचे स्थान द्यावे.”
विजय चौधरी म्हणाले ” आपल्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये आपल्या पालकांचा खूप मोठा वाटा असतो. आई-वडिलांमुळेच मी कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू शकलो. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पूर्वी आजारातून बाहेर पडण्यासाठी आई-वडिलांनी दिलेला आधार आणि बळ हीच माझी खरी ऊर्जा होती. अहंकारापासून दूर राहण्याची खरे शिक्षण आपले माता पिताच देऊ शकतात. आई-वडिलांप्रती सेवा व कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. तसेच आज कौटुंबिक स्तरावर मूल्याधिष्ठित शिक्षण आणि संस्कार देणे ही पालकांची गरज बनली आहे. पालकांनी देशाचा एक चांगला नागरिक घडविण्याचे संस्कार आपल्या पाल्यांना द्यावेत.”
डॉ. विनोदकुमार पाटील म्हणाले ” आई-वडिल हेच आयुष्यात आपल्याला यशाचा खरा मार्ग दाखवतात. आई वडील हेच आपले प्रथम गुरु असतात. त्यांच्याकडून जीवन जगण्याचे खरे शिक्षण मिळते. विश्वशांतीचे अखंड कार्य करणाऱ्या डॉ. कराड सरांच्या हस्ते यशवंत मुलांना घडवणाऱ्या माता पित्यांचा सन्मान होणे हा सुवर्णयोग आहे.”
डॉ. मिलिंद आव्हाड म्हणाले ” मराठवाडा मित्र मंडळ ही प्रादेशिक विचार मांडणारी संस्था नसून संघर्ष गाथा पुढे याव्यात यासाठी कार्य करणारी संस्था आहे. मराठवाड्यातील संतांचा वारसा खऱ्या अर्थाने डॉ. विश्वनाथ कराड सरांनी त्यांच्या शिक्षणातून पुढे चालू ठेवला. त्याच्या हस्ते आदर्श पालकांचा सत्कार होणं हे अभिमानास्पद आहे. मराठवाड्यातील माणसांची संघर्ष यात्रा व त्यांची यश प्राप्ती याचे नेहमीच एक वेगळेपण राहिले आहे.”
श्रीकांत शेळके म्हणाले “आई-वडिलांच्या संस्कारामुळेच मी एक चांगला उद्योजक म्हणून यशस्वी होऊ शकलो. प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने लेकरांना घडवणाऱ्या माता पित्यांचा सन्मान हा उपक्रम निरोगी समाजव्यवस्थेसाठी आदर्शवादी आहे.”
कार्यक्रमाचे संयोजन उद्योजक रवी पाटील, राजेंद्र नारायणपुरे, विठ्ठल चव्हाण व मराठवाडा मित्रपरिवार आयोजन समितीने केले. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मानपत्राचे वाचन डॉ. महेश थोरवे यांनी केले. राजेंद्र नारायणपुरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शालिनी टोणपे यांनी सूत्रसंचालन केले.