पुणे-कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगात कार चालवून 2 तरुण अभियंत्यांचा बळी घेतला. त्याचा हा गुन्हा ड्रायव्हरच्या माथी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पोर्शे कारच्या ड्रायव्हरचे कथित अपहरण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शनिवारी सकाळी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली होती. त्यांनी त्याच्यावर आपल्या नातवाचा म्हणजे अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. यासाठी त्यांनी त्याला आपल्या घरातही डांबून ठेवले होते. पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांना दुपारी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जे एम चव्हाण यांच्या न्यायालयात आरोपीस हजर केले. त्यानतंर न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत सुरेंद्र कुमार यांनी कल्याणी नगर येथे कार अपघात झाला त्यावेळी आपण पुण्यात नव्हे तर दिल्लीत असल्याचा दावा केला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मी सकाळी 11 च्या विमानाने पुण्यात आलो, असे ते म्हणाले.
सरकारी वकील बी एच संचेती यांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला. त्या म्हणाल्या, चालकाचे अपहरण करण्यासाठी बीएमडब्लु गाडी वापरली गेली. या गाडीचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. चालकाला घरात डांबून ठेवण्यात आले. घरातील सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करण्यात आली. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. आरोपी विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल यांची समोरासमोर चौकशी करणे आहे.त्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील म्हणाले, कार चालकाला येरवडा पोलिस ठाण्यातून सोडल्यावर आरोपीने त्यास आपल्या गाडीतून बंगल्यावर नेले. तिथे त्याचा एक मोबाइल त्यांनी स्वतःहून काढून घेतला. त्यानंतर त्यास बंगल्यात डांबून ठेवण्यात आले. त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. यामुळे चालकाने सुरुवातीला पोलिसांना आपण स्वतः गाडी चालवत असल्याचा जबाब दिला.