मुंबई-राज्यात आता राज्य विधान परिषदेच्या चार जागांसाठी देखील निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात ही निवडणूक होणार आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. या चारही मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 26 जून रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे.
असा आहे नवा निवडणूक कार्यक्रम
31 मे 7 जून उमेदवारी अर्जाची मुदत
10 जून अर्जाची छाननी
12 जूनपर्यंत उमेदवारी परत घेण्याची मुदत
26 जून प्रत्यक्ष मतदान
1 जुलै मतमोजणी प्रक्रिया
वास्तविक या आधी देखील या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, शिक्षक संघटनांनी याला विरोध केल्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
आधी झालेल्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान शाळांना सुट्टी असल्याने या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शंका अनेक शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. आता 15 जूननंतर शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आता 26 जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चार जागांचा समावेश आहे. विधान परिषदेमध्ये असलेल्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य हे शिक्षक मतदार संघातील तर 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 26 जून रोजी राज्यात मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.