उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत/ एस आयटी चौकशी करा ..
पुणे- आजपर्यंत आमदार सुनील टिंगरे कोणकोणत्या नागरिकांच्या कामासाठी मध्यरात्रीनंतर पोलीस ठाण्यात गेलेत ? असा सवाल उपस्थित करत आता आमदार सुनील टिंगरे व बिल्डर यांच्यातील संबधांची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे .
कल्याणीनगर परिसरातील कार अपघातात 2 तरुण अभियंत्यांचा बळी गेला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात जाऊन सरकार कामात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला. त्यामुळे त्यांच्यावर भादंवि कलम 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.टिंगरे यांच्या बरोबर संबधित पोलीस आणि अधिकारी यांचीही चौकशी करून कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.
मुनव्वर कुरेशी याबाबत म्हणाले, कल्याणीनगर येथे घडलेली घटना निंदनीय आहे. पाेलिसांनी केलेली ताेकडी कारवाई पाेलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी आहे. या दुघर्टनेत जीव गमावलेल्या 2 निष्पाप तरुण व तरुणीला न्याय देण्यासाठी आराेपींवर लावलेल्या भारतीय दंड संहिता कलमांत वाढ करावी. ज्या शाेरुमच्या मालकाने गाडी रजिस्ट्रेशन न करता दिली, त्यालाही या गुन्हयात सहआरोपी करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.
पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व हाॅटेल्स, पब यांचे परवाने तपासणी करुन, अवेळी चालणाऱ्या पब व हाॅटेल्सवर कडक कारवाई करण्यात यावी. शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावे, अन्यथा पक्षाच्यावतीने याबाबत तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
आझाद समाज पक्षाचे पुणे अध्यक्ष अॅड. ताैसिफ शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक आमदार सुनील टिंगरे व संबंधित पाेलिसांची या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री हाेत असून पब संस्कृतीमुळे शहराची सुरक्षितता धाेक्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत एसआयटी नेमून सखाेल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या प्रकरणी केली आहे.