पुणे- विशाल अग्रवालसह अनेक बिल्डर चुकीचे काम करतात म्हणून ते भाजपबरोबर संलग्न आहेत आणि या लॉबीला देवेंद्र फडणवीस पाठिशी घालतात असा स्पष्ट आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या शिवाय कल्याणी नगर अपघातातील तपास अधिकारी असलेल्या पोलिसाची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते. हा सगळा फार्स असू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचे समाधान करण्याकरता ते आले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला, असे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.दरम्यान रवींद्र धंगेकर पुढे बोलताना म्हणाले की, पुणेकरांना दाखवणारा देखावा आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्या रात्री बरीच माया जमा केली आहे. पोलिसांनी चुकीचा तपास केला. पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही, असे धंगेकरांनी म्हटले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, विशाल अग्रवाल हा बिल्डर डीफॉल्टर आहे. प्रचंड प्रमाणात पुणे महापालिकेत या बिल्डरकडून पैसे येणे आहेत. विशाल अग्रवालसह अनेक बिल्डर भाजपबरोबर काम करतात. ते चुकीचे काम करतात म्हणून ते भाजपबरोबर संलग्न आहेत. या लॉबीला देवेंद्र फडणवीस पाठिशी घालतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
धंगेकरांचे कारवाईसाठी ट्विट
कल्याणीनगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलिस प्रशासन नमले. आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे. परंतु केवळ विशाल अग्रवाल याला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलिस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे.मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल असाच तपास पोलिसांनी केला आहे.अपघाताच्या रात्री काय झाले याबाबत येरवडा पोलिस स्टेशन व ससूनमधील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करण्यात यावे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे.