शरद पवार भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन चालणारे
पुणे-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी बसले. या घटनेला 12 वर्षे लोटली. त्यानंतर आता त्यांना माझ्यावर टीका करण्यास जाग आली आहे, असे ते म्हणालेत.शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे व मुंबई महापालिकेचे माजी अधिकारी गो.रा. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे ट्रकभर पुरावे असल्याचेही ते म्हणाले होते. पण आता ते दोघेही कुठेही दिसत नाहीत, असे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिले.
मी त्यांचे (शरद पवार) काही मंत्री घरी बसवले होते. या घटनेला आता 10 – 12 वर्षे झाली. आता एका तपानंतर त्यांना जाग आली आहे. शरद पवार यांचे नातलग पद्मसिंह पाटील यांचे पुरावे आम्ही बाहेर काढले तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. समाजाच्या हितासाठी पुरावे बाहेर काढणे दोष आहे का? म्हणून मी जिथे जिथे ते दिसले तिथे बोलत गेलो, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, प्रत्येक पक्षात समविचारी लोक असतात. तसे आव्हाड आणि ते आहेत. त्यांना दुसरे काहीच दिसत नाही. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे त्यांना एकच दिसते. मी हवेत बोललो असतो तर शरद पवारांचे मंत्री घरी गेलेच नसते. मी आंदोलन केले म्हणून त्यांना जावे लागले. मी त्यांच्याच नाही तर अनेक पक्षांच्या मंत्र्यांना घरी बसवले.
आज अचानक शरद पवारांची झोप का उडाली मला माहिती नाही. पण मी केव्हाच कोणत्याही एका पक्षावर टीका केली नाही. माझा असा कोणता हेतूही नसतो. माझ्यासाठी देश व समाज सर्वप्रथम आहे. जळगावचे सुरेश जैन, पद्मसिंह पाटील त्यांचे (शरद पवार) नातेवाईक आहेत. पद्मसिंह पाटील घरी बसले. नवाब मलिकही घरी गेले. नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही शरद पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. शरद पवार भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन चालणारे आहेत. चारित्र्य स्वच्छ असले पाहिजे. चारित्र्य सांभाळून चालले पाहिजे, असेही अण्णा हजारे यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यात मतदान पार पडले. महाविकास आघाडी व महायुतीने एकमेकांविरोधात जोरदार प्रचार केला. आता 4 जूनला निकाल येणार आहे.