पुणे-पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कुणाचाच धाक नसल्याचे आता हळूहळू समोर येत आहे. त्याचे काळे कारनामे आता उजेडात येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीने या अल्पवयीन आरोपीवर आपल्या मुलाला त्रास दिल्याचा व त्याच्यामुळे आमच्यावर शाळा बदलण्याची वेळ आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात या अल्पवयीन आरोपीने मद्यपान करून सुसाट गाडी चालवत 2 तरुण अभियंत्यांचा बळी घेतला. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. त्यातच आरोपीला अवघ्या 15 तासांतच जामीन मिळाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एका ट्विटद्वारे या मुलाच्या अरेरावीचा भांडाफोड केला आहे.
https://x.com/TanpureSonali/status/1792997540901556676
सोनाली तनपुरे आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या की, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या… संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असे त्या म्हणाल्या.
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणीही सोनाली तनपुरे यांनी यावेळी केली.
https://x.com/TanpureSonali/status/1792997543044849783
प्राजक्त तनपुरेंनी दिला पालकांना दोष
दुसरीकडे, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणी आरोपीचे आई-वडीलही तेवढेच दोषी असल्याचा आरोप केला आहे. छोट्या शहरांतून मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या सर्वसामान्य तरुण युवक युवतीचे स्वप्ने चिरडणारा श्रीमंत बापाचा लेक तर दोषी आहेच, मात्र त्याचसोबत या सिस्टीमला ढील देणारे गृह खाते, प्रशासन व्यवस्था, त्या मुलाचे पालक देखील तितकेच दोषी आहेत, असे ते म्हणालेत.
सर्वसामान्यांच्या जीवाचा खेळ मांडला आहे. बड्या लोकांना पाठीशी घालत सामाजिक व्यवस्था अस्थिर करण्याचे पाप हे सरकार करत आहे. घटनास्थळावरील नागरिकांची जागरूकता आणि सोशल मीडियातून निर्माण झालेला दबाव, यामुळे परिणामकारक कारवाई होत आहे. अन्यथा चालकाला आरोपी करून मुलाची, बापाची तसेच अन्य यंत्रणांची सहज सुटका झाली असती. हे नेक्सस मोडून काढायला योगदान देणाऱ्यांचे देखील आभार मानले पाहिजे, असेही प्राजक्त तनपुरे या प्रकरणी म्हणालेत.
हिट अँड रनच्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलाच्या वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटकही करण्यात आली आहे. आज अग्रवाल यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केले जाणार आहे.