पुणे: कल्याणीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांना अलिशान गाडीखाली चिरडणाऱ्या अल्वपयीन मुलाच्या गर्भ श्रीमंत वडिलांना पुणे पोलिसांनी आज पहाटे संभाजीनगर मधून अटक केली आहे. दुपारपर्यंत पोलीस त्यांना पुण्यात घेऊन येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातल्या एका लॉजमधून विशाल अग्रवालला पकडण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्य इतर दोघांना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आणि त्यानंतर पोलीस पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.विशाल अग्रवाल हा कारने छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये रात्री आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील एका छोट्या लॉज मध्ये तो थांबला होता. त्याच्यासोबत असल्या कारचा ड्रायव्हर आणखी दुसरा एक जण दुसऱ्या लॉजमध्ये थांबले होते.
माध्यमे आणि जनक्षोभ यामुळे सरकारी पातळीवर हालचाली
कल्याणीनगरमध्ये अपघात झाल्यावर संबंधित अल्पवयीन मुलाला जमावाने चोप दिला होता.राज्यातील नागरिकांत निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी त्यांनी संपर्क साधून सखोल तपास करण्याचा आदेश सोमवारी दिला.
या प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती. राज्य उत्पादन शुल्क आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) नोटिसा पाठविण्याचा सोपस्कार केला.
अशा घटनांत एरवी पोलिस संबंधित युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करतात. तेथे उपचार पूर्ण झाल्यावर त्याला अटक करतात आणि त्यानंतर न्यायालयात हजर करतात. कल्याणीनगरच्या घटनेत संबंधित युवकाला पोलिसांनी दुपारी बारानंतर अटक केली असती तर त्याला रविवारचा दिवस पोलिस कोठडीत राहावे लागले असते आणि सोमवारी न्यायालयात हजर करावे लागले असते.
पोलिस कोठडीत राहण्याची त्या मुलावर वेळ येऊ नये म्हणून जुजबे प्रथमोपचार करून तत्परतेने त्याला सुट्टीच्या न्यायालयात हजार करण्यात आले. कलमेही जामीनपात्र असल्याने त्याला सहज जामीन मिळाला. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल राज्यातील नागरिकांत संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पोलिस आयुक्तांना कडक कारवाई करण्याचा आदेश द्यावा लागला.
ही अलिशान मोटार अग्रवाल यांनी बंगळुरूमधून सुमारे तीन कोटी रुपयांना मार्च महिन्यात खरेदी केली. तात्पुरत्या नोंदणीवर ती मोटार पुण्यात आणली. येथे आल्यावर त्यांनी तातडीने परिवहन कार्यालयात नोंदणी करणे गरजेचे होते. परंतु अग्रवाल यांच्याकडून अद्याप नोंदणी झालेली नाही. त्यामुळे त्या मोटारीला नंबर मिळालेला नाही. याबाबतच्या मुद्द्यांची पोलिसांनी दखल घेतली असून, त्यांच्यासमवेत आम्हीही कारवाई करू, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी स्पष्ट केले आहे.