पुणे- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी सहकार नगर परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैशांचे वाटप केले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, नितीन कदम अनिल सातपुते ,सतीश पवार आदी कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी त्यांना पैसे वाटप आरोपाची चौकशी करून कार्यवाही करू असे सांगून हे प्रकरण पोलिसांनी शांत केले पण मतदान झाल्यावर धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी यांनी खोटे आरोप करत स्टंटबाजी केली आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. जेव्हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत होते तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला येथे जमाव जमवून घोषणाबाजी केली होती त्यांच्यावर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आणि भाजप आमदार मिसाळ यांनी आदल्या दिवशी कोणावर गुन्हा दाखल होतो ते धंगेकर यांना कळेलच असे प्रतिआव्हानही दिले होते . या सर्वच बाबींनी पुणे पोलीस टार्गेट होऊ लागले असताना आता याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता, भाजपच्या देखील माजीनगरसेवकांसह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस कर्मचारी अभिजीत तुकाराम वालगुडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भाजपचे माजी नगरसेवक राजा उर्फ आबा शिळीमकर, महेश वाबळे व त्यांचे इतर 20 ते 25 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भादंवी कलम 143, 145 ,149 ,188 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी यांनी पोलिस सहआयुक्त पुणे शहर यांचा जमावबंदीचा आदेश लागू असल्याचे माहिती असताना सुद्धा व पोलिस विभागातर्फे वेळोवेळी आदेशाचे पालन करण्याचे जाहीर आवाहन केले असताना, अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला. बेकायदेशीर जमाव जमवून सहकारनगर पोलिस स्टेशन समोर रस्त्यावर घोषणाबाजी करून सदर आदेशाचे उल्लंघन करताना आरोपी मिळून आले .त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस पवार करत आहेत.