श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर नवरात्र महोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील व्याख्यान
सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचे द्वि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष
पुणे : हिंदुस्तान असा एकच देश आहे, ज्याची संस्कृती सगळ्यांना सामावून घेणारी आहे. इतर धर्मात जाण्यासाठी धर्मांतर करून घ्यायला सांगतात. हिंदू धर्म हा सगळ्या संस्कृती आपल्यामध्ये सामावून घेतो. आपण हिंदू आहोत म्हणजे माणुसकीच्या जमातीचे आहोत त्यामुळे हिंदू आहोत हे ताठ मानेने सांगायची गरज आहे. हिंदू हा एकच धर्म आहे तर जगातील बाकी धर्मसंस्था आहेत. त्यामुळे हिंदू धर्माच्या बाबतीत अहंकार असलाच पाहिजे, असे मत व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर यंदा २५० वे वर्ष साजरे करत आहे. यंदाच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावरील व्याख्यान यावेळी झाले. यावेळी मंदिराचे अभिजीत जोशी, अद्वैत जोशी उपस्थित होते.
शरद पोंक्षे म्हणाले, सावरकर वाचायला लागल्यावर डोळ्यातून फक्त पाणी येते. विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखा अप्रतिम नररत्न भारतात जन्माला आला. परंतु सावरकरांच्या बाबतीत सतत अन्याय केला गेला. कारण सावरकरांवर प्रेम करणारे गप्प आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप होतात.
सेनापती हा फार महत्त्वाचा असतो. नेतृत्व हरवले की सगळे सैरभैर होतात म्हणून जीवाच्या आकांताने विनायक दामोदर सावरकर कैदेतून सुटण्याचा प्रयत्न करत होते. कैदेतून सुटल्यावर विविध मार्गाने काम करता येईल, असा त्यांनी विचार केला. त्यांनी दिलेल्या माफिनाम्यात कुठेही केलेल्या कामाची माफी नाही किंवा लाज नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंदिराचे द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष
सदाशिव पेठेतील पेशवेकालीन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर यंदा द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यामध्ये विविध याग, कीर्तन तसेच दिग्गज कलाकार आपली कला सादर करीत आहेत. मंदिरात २२ मे पर्यंत नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे.