पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी पहाटे अल्प आजाराने दुखद निधन झाले. विश्वास गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, मुली आणि जावई असा परिवार आहे आणि .दरम्यान गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर सात दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भाजपचे माजी शहराध्यक्ष, पर्वती मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांच्या निधनाच वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचा भाजपचं काम तळागाळात नेण्यात मोठा वाटा होता. त्यांची कवी मन आणि सतत पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे नेते म्हणून ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. असे म्हणत विश्वास गांगुर्डे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनीत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
स्वर्गीय अण्णा जोशी,अरविंद लेले ,गिरीश बापट, शिवाजीराव आढाव यांच्या समवेत काम केलेले विश्वास गांगुर्डे यांचा राजकीय प्रवास पुणे मनपाचे नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. विश्वासरावांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे विश्वासरावांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. १९७८ मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९२-१९९७ काळात गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भुषविले.
विश्वासराव हे विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते नेहमीच पुरस्कर्ते होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर आणीबाणी विरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. १९९२-१९९५ या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.
१९८०-८५ आणि १९८५-९० दोनवेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, १९९९ मध्ये ते पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या काळात त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले.