तळेगाव दाभाडे, दि. 11 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ काल (शुक्रवारी) तळेगाव दाभाडे शहरातून भव्य प्रचार फेरी काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तळेगाव शहरातून बारणे यांना किमान दहा हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही भाजपा नेते व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
खासदार बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तथा भाऊ गुंड, शहराध्यक्ष अशोक दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, संतोष भेगडे, शिवसेनेचे तालुका संघटक सुनील मोरे, शहरप्रमुख देव खरटमल, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, रवींद्र दाभाडे, चित्रा जगनाडे, राजेंद्र जांभुळकर, तसेच स्वाती जाधव, शैलजा काळोखे, शोभा परदेशी, शोभा भेगडे, रजनी ठाकूर, कल्पना भोपळे, संतोष दाभाडे, अरुण माने, प्रमोद देशक, संजय वाडेकर, सुरेश वाडेकर, सतीश राऊत, सचिन टकले, आशिष खांडगे, गोकुळ किरवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलांच्या दणदणाटात व फटाक्यांच्या कडकडाट मारुती मंदिर चौकातून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. भगवे फेटे परिधान केलेले शेकडो तरुण आणि पांढरे फेटे परिधान केलेल्या महिला यामुळे प्रचार फेरीला वेगळीच रंगत भरली होती. खासदार बारणे यांच्यासह प्रमुख नेते विजय रथावर आरुढ होते. ठिकठिकाणी औक्षण करून बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात येत होत्या. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘तिसरी बार, आप्पा बारणे खासदार’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मारुती मंदिरातून सुरू झालेली ही प्रचारफेरी जिजामाता चौक, सुभाष चौक, माळी आळी, शाळा चौक, गणपती चौक, चावडी चौक, डोळसनाथ महाराज मंदिर, कुंभार आळी, भेगडे आळी, गणपती चौक, मुख्य बाजारपेठ, राजेंद्र चौक मार्गे मारुती मंदिर येथे परत आली. त्या ठिकाणी छोट्याशा सभेने प्रचार फेरीची सांगता झाली.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळातून बारणे यांना मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन बाळा भेगडे यांनी केले. तालुक्यातील सर्व प्रमुख नेते तळेगावमध्ये असल्यामुळे तळेगावच्या मताधिक्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे, असे शेळके म्हणाले. आपल्याला तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत असल्याबद्दल बारणे यांनी सर्वांचे आभार मानले.