चाकण : लांडेवाडीतील वनखात्याची २५ एकर जमिन लाटण्याचे काम शिवाजीराव आढळराव पाटलांनी केल्याचा मोठा आरोप चाकणच्या भर सभेत काही कागदपत्रे फडकावीत महाविकास आघडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
चाकण मध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या जाहीर सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यासभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार संजय जगताप, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार राम कांडगे, प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ही देशाची निवडणूक आहे. तरी सातत्याने वैयक्तिक हास्यास्पद टीका केली जातीये, असं सांगत डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की गद्दारी गाडली जाणार हे आता स्पष्ट झालं आहे. आढळराव पाटील हे देशाच्या वन आणि पर्यावरण समितीचे सदस्य होते. त्याचा वापर जमिनी लाटण्यासाठी केला. लांडेवाडीतील गट क्रमांक 657 मधली 25 एकर वन जमीन लाटली, तीही भूमीहीन शेतमजूर असल्याचे दाखवून. इतकच नाही तर ब्ल्यू लाईनमध्ये दोन एकरचा सातबारा केला. कसं शक्य झालं हे? असा सवालही डॉ. कोल्हे यांनी पुराव्याच्या आधारे केला. एवढच नव्हे तर देवस्थानची 13 एकर जमीनही लाटण्याचे काम आढळरावांनी केल्याचा आरोप कोल्हेंनी केलाय.
दोन दोन उपमुख्यमंत्री आज आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत, पण त्यांनी आता उत्तर द्यावं, आढळराव पाटलांनी ज्या जमिनी लाटल्यात त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी करुन कारवाई करणार की आढळरावांना पाठीशी घालणार? या प्रश्नाचं उत्तर द्यावे. असं आव्हान दिले.
देशाच्या निवडणुकीत पंतप्रधानांची भाषा बदलत चालली आहे. दहा वर्षात काय केलं हे सांगणं गरजेचं असताना धार्मिक तेढ वाढवणारी भाषण पंतप्रधान करु लागलेत.
याचाच अर्थ निवडणूक हातातून गेली आहे. म्हणून आता भाषा बदलत असल्याच डॉ. कोल्हे म्हणाले.
बिबट्याच्या प्रश्नावरुन आज पुन्हा डॉ. कोल्हे भाऊक झाले. या प्रश्नांवरुन थेट त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष केलं. भावनिक भाषण करु नका हे
तुम्ही सहज म्हणू शकता, मग राज्य आपप्ती जाहीर का करत नाही, असा सवाल करत डॉ. कोल्हे म्हणाले की, इकडं तिकडं माणसांना पिंजरात टाकण्यापेक्षा बिबट्यांना पिंजरात टाका ना. आमची माणस आम्ही बिबट्याच्या हल्ल्यात गमावतोय.
मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे. मतदार संघातील पीडिसीसी बँक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.