कर्जत-अजित पवार यांनी शुक्रवारी आपला पक्ष बारामतीसह शिरूर, सातारा व रायगड या लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. बारामती NCP च्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना अजित पवार गटाचा थेट सामना करावा लागेल असा अंदाज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी जागा वाटपाच्या मुद्यावर आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ताकद उभी करायची आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आणायचे आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार निवडून येणे गरजेचे आहे. यात बारामत, शिरूर, सातार व रायगडमध्ये आपले उमेदवार असतील. इतर जागांवर शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल. या प्रकरणी त्यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाली आहे, असे अजित पवार याविषयी बोलताना म्हणाले.
काहीजण आमच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे आम्ही तिकडे गेल्याचा आरोप करतात. मंत्रिमंडळात मी त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला या प्रकरणी टार्गेट केले गेले. पण माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने मला क्लिनचीट दिली. माझ्यावर सातत्याने आरोप होतात. पण मी कामाशी कटिबद्ध असणारा नेता आहे. आज पुन्हा माझ्याकडे अर्थखाते असून, त्याचे तब्बल 6 लाख कोटींचे बजेट आहे, असे अजित पवार यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना म्हणाले.
मी गत अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करत आहे. पण 2004 मध्ये जे घडले ते आज मला समजले. पूर्वी जनसंघावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर राहत होतो. पण आता काळ बदलला आहे. आपण आपली विचारधारा सोडली नाही. माझे मुस्लिम समुदायालाही सांगणे आहे की, आम्ही भाजप व एकनाथ शिंदेंसोबत आहोत. पण आम्ही आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारावरच मार्गक्रमण करत आहोत.
अजित पवार यांनी यावेळी उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सोडवण्याचीही ग्वाही दिली. सध्या पक्षाच्या काही मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. पण उर्वरित मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावे यासाठी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. आमचा इतर मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद देण्याचा प्रयत्न आहे. मी या प्रकरणी लवकरच अन्य नेत्यांसोबत बसणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
विकासकामांच्या मुद्यावर आपले पहिले प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना, दुसरे खासदारांना व तिसरे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मंत्री आदिती तटकरे यांना युवती संघटनेतील काही वाद तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच युवक संघटनेलाही अंग झटकून कामाला लागण्याचे आदेश दिले.
मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला आमदार प्रकाश साळुंके यांना मंत्री करता आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले. पण आम्ही त्यांची समजूत काढली. त्यांना कार्याध्यक्ष करण्याचे आश्वासन दिले. आता शब्द दिला म्हणजे तो अंमलात आणावाच लागेल. त्यामुळे शब्द देताना 10 वेळा विचार करा, असे अजित पवार म्हणाले.