सातारा -बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विषयी मी जे वक्तव्य केले, ते अजित पवार यांच्या विषयी मला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केले होते. वास्तविक मी कायमच महिलांचा सन्मान केला आहे. देशामध्ये सर्वात आधी महिला आरक्षण लागू करण्याचा निर्णय मी घेतला होता. खासगी क्षेत्रातील महिलांसाठी आरक्षणाचा निर्णय देखील मी घेतला होता. मी केंद्रात संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलांमध्ये महिलांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी कायमच महिलांचा सन्मान केला असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र, या सर्व स्पष्टीकरणामागे सुनेंत्रा पवार यांच्या विषयी शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आहे. सुनेत्रा पवार या पवार घराण्यातील नसून बाहेरून आलेल्या उमेदवार असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यामुळे आता शरद पवार यांनी स्वतः याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.शरद पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे वाद्ग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. पण आता स्वतः पवारांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच मोठे काम केल्याचेही ते म्हणालेत.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे तसेच सून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यातच अजित पवार विरुद्ध शरद पवार यांचा थेट लढा या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे नाणे खणखणीत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार हे कायम आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. येथील मतदार हे पुरोगामी विचारांचे असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे हे विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.