पुणे-आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले आहे कोथरूड मधील . उजवी भुसारी काॅलनी परिससरातील एका इमारतीत सदरची कारवाई करण्यात आली. सट्टेबाजांकडून मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुकेशकुमार शैलेंद्रकुमार साहू (वय २४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय २१), जसवंत भूषणलाल साहू (वय २२), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय २६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय २३), संदीप राजू मेश्राम (वय २१), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय २४), मोहम्मद ममनून इस्माइल सौदागर (वय ३२), अमित कैलास शेंडगे (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यां आरोपीची नावे आहेत. आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम मूळचे छत्तीसगडचे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार प्रवीण ढमाळ यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोथरुडमधील उजवी भुसारी काॅलनी परिसरातील पटेल टेरेस इमारतीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेथून लॅपटाॅप आणि मोबाइल संच असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील पुढील तपास करत आहेत.