पुणे–सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर महाराष्ट्रात मराठी पाट्या असाव्यात अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील आणिटिळक रोड वरील नामांकित दुकानांच्या बोर्डवर मराठीत पाट्या नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त असताना देखील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली . दरम्यान पोलिसांनी सर्व प्रकारचे शूटिंग कॅमेऱ्यात केले आहे.मात्र कुठल्याही इंग्रजी पाट्या लावून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यापार्यावर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त नाही . दुसरीकडे इंग्रजी पाट्या लावणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र आम्हाला महापालिकेने नोटीस दिली नाही , द्यायला हवी होती , आम्हाला मराठी पाट्यांचा कायदाच ठाऊक नाही , समजावून सांगायला हवे होते ,तोडफोड हि पद्धत योग्य नाही असा पवित्र घेत व्यापारी बाणा दाखविला आहे.
जंगली महाराज रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी दाखल झाले. हातात बांबूच्या काठ्या घेऊन त्यांनी लिव्हाईस दुकानाच्या काचेची तोडफोड केली. तसेच सदर दुकानाचा इंग्रजी अक्षरातील बोर्ड देखील फोडला. त्यानंतर इतर दुकानांकडेही मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा वळवला.यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांना दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात याकरिता दोन महिन्यांचा वेळ दिला होता. त्यानंतर याबाबत आम्ही पुणे मनपाला देखील निवेदन देऊन ज्या दुकानदार पाट्या मराठीत पाट्या लावत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाही .त्यामुळे आम्हाला आक्रमक होत सदरची कारवाई करावी लागत आहे .
कायदा राबविणारे राबवीत नाहीत पण त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करतात–त्यांना घाबरत नाही
आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याने नवीन कोणत्याही गुन्हे दाखल होण्याची आम्हाला भीती वाटत नाही. महाराष्ट्रात पाटया या मराठीतच असाव्यात असा सुपरिण कोर्टाने निर्णय देऊनही तो राबवीत का नाही असा आमचा आग्रह असून प्रशासनाने कारवाई केली नाही त्यामुळे आम्हाला हे करावे लागते , आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करू.यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर म्हणाले ,पुण्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या असावेत या दृष्टीने पुणे मनपाला चार दिवसांपूर्वी आम्ही लेखी पत्र दिले होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोणतीही पावले उचलण्यात आले नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मराठीत पाट्या असव्यात असा निर्णय दिल्यानंतर देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला पहिले पत्र द्यावे त्यानंतर पुढील आक्रमक आंदोलन करावे असे सुचित केले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी इंग्रजी भाषेत आम्हाला पाट्या दिसतील त्या ठिकाणी मनसे स्टाईलने आम्ही कारवाई करू. मराठी भाषेत दुकानदारांनी पाट्या लावण्यात कोणत्याही प्रकारचा आक्षेप असण्याचे कारण नाही.