शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे डॉ. आंबेडकरांच्या पुण्यातील आठ पुतळ्यांसमोर शाहिरी पोवाड्यांचे सादरीकरण
पुणे : जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार …अशा शब्दांत पोवाडयाच्या माध्यमातून पुणे रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शाहिरांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. पुणे आणि परिसरातील विविध आठ पुतळ्यांसमोर संविधान भीमरथ या फिरत्या रंगमंचाद्वारे ‘शाहिरी भीमवंदना’ हा पोवाडयाचा कार्यक्रम सादर करण्यात आला, त्याची सुरुवात या पुतळ्यापासून करण्यात आली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यंदाचे हे नववे वर्ष आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शाहिरी भीमवंदना या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर देवराव कांबळे, महादेव जाधव, दत्ता भारती, जालिंदर शिंदे, पोपट हांगे, गोरख खामकर, वर्षा देशपांडे, राजकुमार गायकवाड, चंद्रकांत माने, ऋतुजा माने, अरुणकुमार बाभुळगावकर, आदी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि त्यांनी समाजाला दिलेली शिकवण पोवाड्याच्या माध्यमातून सादर करीत शाहिरांनी महामानवाला अभिवादन केले. जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार या शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेल्या पोवाडयातून डॉ.आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य शाहिरांनी उपस्थितांसमोर उलगडले.
भारताचे थोर शिल्पकार, भीम भास्कर, आंबेडकर वीर, भीमाई जन्म देई, भीम पराक्रमी घडला इतिहास… यांसारखे पोवाडे देखील यावेळी सादर झाले. कॅम्प अरोरा टॉवर, अप्पर इंदिरानगर, पद्मावती, सिंबायोसिस सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, दापोडी- बोपोडी या आठ ठिकाणी पोवाडयाचा कार्यक्रम झाला.