पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी पुणेकरांनी एकत्र येत तब्बल १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजित उपक्रमात ‘दहा हजार किलोची मिसळ’ देखील नागरिकांना मोफत देण्यात आली.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ १० हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांना मोफत ताक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये मिसळ व त्यापेक्षा लहान कढईमध्ये ताक तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. महेंद्र मारणे, विलास कसबे, संतोष पंडीत, बाळासाहेब रुणवाल, एकनाथ ढोले, संदेश काथवटे, सचिन विप्र, रवि गुडमेटी, राम तोरकडी, शेखर काळे, रुपेश चांदेकर, श्रीधर चव्हाण, प्रल्हाद गवळी, यशोदीप सोनवणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.
उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १००० किलो, कांदा ८०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला १४० किलो, लाल मिरची पावडर ४० किलो, हळद पावडर ४० किलो, मीठ ५० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र ७ किलो, फरसाण २५०० किलो, पाणी १०००० लिटर, कोथिंबीर १२५ जुडी, लिंबू १००० नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश ५० हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास ५० हजार यांसह स्लाईड ब्रेड १.५ लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे. तसेच ताकासाठी १ हजार किलो दही वापरण्यात आले.
महात्मा फुले यांची जयंतीदिनी गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली होती. त्यावेळी पुण्यातील विविध सामाजिक संस्थाना देखील या मिसळीचे वाटप करण्यात आले होते.