डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिपादन
पुणे, दि. १४ एप्रिल २०२४: समाज परिवर्तनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता व हिंसेला कुठेही स्थान न देता हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली. माणूस म्हणून जगण्यासाठी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेतून प्रत्येक भारतीयाला दिला आहे असे प्रतिपादन केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान संशोधनाचे सेवानिवृत्त संचालक व ज्येष्ठ वक्ते डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी रविवारी (दि. १४) केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणमधील उत्सव समितीच्या वतीने रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. दत्तात्रय गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड, महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र गायकवाड (महापारेषण, मुंबई), अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले व श्री. विठ्ठल भूजबळ यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्राचे अभ्यासक व तज्ज्ञ म्हणून देश उभारणीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची माहिती दिली.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सिद्धार्थ धिवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. दत्तात्रय गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिंतन: आशय एवं विमर्श’ या हिंदी अनुवादित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवलिंग बोरे यांनी केले तर श्री. बाबासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त उत्सव समितीने पुढाकार घेतला.