पुणे-राज्यात 80 टक्के ठिकाणी महिलांकरीता स्वच्छतागृह उपलब्ध नाही. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जातात, पण महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले जात नाही. राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर साफ स्वच्छतागृह असणे बंधनकारक करावे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. महिलांना पायाभूत सुविधांचा अभाव आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्र, पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त), पत्रकारिता व जन संज्ञापन विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा’ पहिला टप्प्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. विधान परिषदेच्या उपसभापती आणि अध्यक्षा स्त्री आधार केंद्र डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील 200 महिला मतदारांचे सर्वेक्षण एका प्रश्नावली फॉर्मच्या माध्यमातून करण्यात आले. पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक अभ्यासाचा भाग म्हणून उत्स्फूर्तपणे सर्व्हेक्षण केले. यामध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना व त्यांच्या उमेदवारांकडून असणाऱ्या अपेक्षा याचा अभ्यास केला गेला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिलांना वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत. त्यांनी काहीं अपेक्षा व्यक्त केल्या आहे. निवडणूक नेमकी का घेतली जाते तर लोकप्रतिनिधी निवडणे आणि विकासकामे करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांना जाणवते. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक होणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटत आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी स्वच्छतागृह नाही, पुरुषांच्या तुलनेत पगार महिलांना कमी आहे, हुंडा अधिक घेतला जात आहे, लैंगिक अत्याचार मध्ये आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, महिलांना राजकारणात स्वतंत्र काम करण्यास वाव मिळावा, सिलेंडर दर कमी व्हावे, ईव्हीएम द्वारे पारदर्शक निवडणूक पार पडाव्यात, महिलांना स्वतःचे मत मांडणे अधिकार हवा असे मत महिलांनी सर्वेक्षणात मांडले आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा अशाप्रकारे दुसरी प्रश्नावली घेऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आत्ताच सर्वेक्षणात 200 महिला विविध क्षेत्रातील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. सर्व वयोगटातील या महिला आहे. महिला मतदार यांच्यासाठी खास काही मुद्दे घ्यावेत असे निवडणूक आयोगास वाटत आहे त्यांनी ते या अहवाल मधून घ्यावे. सर्व राजकीय पक्ष आणि महिला आघाडी प्रमुख यांना हे मुद्दे आम्ही देणार आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक उमेदवाराने महिलांचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचे आहे. महिलांना निवडणूक जवळ आली असे माहिती असते पण त्यातील नेमकी माहिती आणि महिलांचे मुद्दे पोहचवणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.