नाशिक-वग सम्राट दादू इंदुरीकर हे मराठी बोली भाषेचा मूळ अर्थ बाजूला काढून, आपल्या शब्दातून भाषेला वेगळा अर्थ प्राप्त करून दयायचे,त्यातून विनोद घडवायचे, येवढे मराठी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते. त्यांची एक वेगळी विनोदाची स्वतंत्र शैली होती. सामान्य कला रसिकांना कळेल अशा सोप्या शब्दात भाषेची पेरणी करायचे, अशा शब्दात लोककलेच्या अभ्यासकांनी शनिवारी त्यांच्या लोकरंगभूमीवरील योगदानाबद्दलच्या आठवणीला उजाळा देत,त्यांची सावळा कुंभार ही भूमिका असलेले “गाढवाचं लग्न” आजही अजरामर आहे. हे त्यांनी परिसंवादाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
शनिवार दि.16 मार्च रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नाशिक येथे “वग सम्राट दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला मिळालेले योगदान”या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात केला होता.यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल व दर्शन थियटर निर्मित संजय चव्हाण आणि राजेंद्र सरोदे (इंदुरीकर ) यांच्या कलापथकाने “गाढवाचं लग्न”हे विनोदी वगनाट्य सादर करून कला रसिकांना खिळवून ठेवले.या वगनाट्याचे या वेळचे विशेष म्हणजे ज्यांनी दादू इंदुरीकर यांच्या सोबत दिवाणजीची भूमिका केली होती.ते जेष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांचा सुद्धा या वगनाट्यात सहभाग असल्याने खऱ्या अर्थाने जुन्या आठवणीला उजाळा मिळाला होता. जेव्हा रंगमंचावर त्यांची इन्ट्री झाली, तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजविल्या.
परिसंवादाला सुरुवात होण्यापूर्वी नाशिकचे जेष्ठ कवि व साहित्यिक उत्तम कोळगावकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदचे सह कार्यवाह सुनिल ढगे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दादू इंदुरीकर यांनी गाढवाचं लग्न या वगनाट्याचे दहा हजारापेक्षा अधिक प्रयोग केले. त्यांची भाषा शैली सामान्य लोकांना कळेल अशी होती. उत्कृष्टपणे भाषेची पेरणी करून रसिकांना हसवत असायचे, त्यांना महाराष्ट्राचे पॉल मुनी म्हणत, प्रतिभाशाली सोंगाड्या म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख तयार केली होती. अशा शब्दात लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ प्रकाश खांडगे यांनी स्पष्ट करून त्यांच्या सोबत झालेल्या भेटीतील अनेक आठवणी सांगितल्या.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जुन्या जाणत्या शाहिर – लोककलावंत यांच्या स्मृतीला उजाळा मिळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. उमा बाबू सावळजकर यांच्या पासून सुरू झालेली वगनाट्याची परंपरा आज पर्यत टिकून आहे. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
खरं तर आपण दादू इंदुरीकर यांची जन्मशताब्दी वर्ष साजरा करीत आहोत. त्यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी शासनाने राज्यभर गाढवाचं लग्न हा प्रयोग सादर केला पाहिजे.अशी मागणी जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी करून इंदुरीकर यांनी चाळीस वर्ष कला रसिकांना हसविले. आपल्या विनोदातून वगनाट्य बघायला आलेल्या नामवंत लोकांना सुद्धा वातानुकूलीत नाट्यगृहात घाम फोडायचे, येवढा ताकदीचा सोंगाडया दादा होते. अशा विविध आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.
त्यांनी संपूर्ण आयुष्य तमाशा कलेला वाहून घेतले होते . उच्चप्रभू लोकांना त्यांनी तमाशाकडे वळविले. दादा सातवी शिकलेले होते, तरी हजरजबाबी होते. त्यांचे समजाबद्दल फार निरीक्षण होते. त्यातून सहज विनोद घडवायचे. गाढवाचं लग्न या वगनाट्याच्या माध्यमातून तमाशाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असे जेष्ठ लेखक सोपन खुडे यांनी सांगितले.
अँड रंजना भोसले यांनी दादांच्या कौटुंबिक आठवणीला उजाळा दिला. माझे आजोबा असल्याने त्यांना जवळून पाहिले. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून दादा होते.जन्माची आणि मृत्यूची नोंद समाजाने घेतली पाहिजे. असे कार्य आपण केले पाहिजे.असा मंत्र दादांनी आम्हाला दिला. त्यांनी पहिली वाजविलेली हलगी बघितली . तो क्षण बघण्याची संधी मिळाली.आपल्या कुटुंबावर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांचे चिरंजीव गणेश इंदुरीकर यांनी हा वारसा पुढे नेला होता. पण त्यांचे अकालीन निधन झाल्याने या वग नाट्याचे काही वर्षे प्रयोग थांबले होते.याबद्दल त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
हरिभाऊ वडगावकर लिखित “गाढवाचं लग्न”असे वग नाट्य दादू इंदुरीकर यांच्या नंतर आता यापुढे कोणी लिहू शकणार नाही. अन सादर ही करू शकणार नाही. कारण येवढ्या ताकदीचे हे लिखाण आहे. या वगनाट्यातून अनिष्ट रूढी प्रवृत्तीवर कोरडे ओढले आहे. त्यामुळे असे वगनाट्य पुन्हा होणे नाही. अशा शब्दात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी आपले मत मांडले.