पुण्यासह सोलापूर, नगर, सातारा, अकोला, वर्धा, नाशिक,बुलढाणा, भंडारा यांसह विविध शहर-जिल्ह्यांतील महिलांचा गौरव
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक, अनाथ, शिक्षण, आरोग्य, दिव्यांगांसह ज्येष्ठ आणि गोमातेसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील २५ कर्तृत्ववान महिलांना महा एनजीओ फेडरेशनतर्फे राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महा एनजीओ फेडरेशन अंतर्गत असलेल्या ७५० हून अधिक सामाजिक संस्था या स्वत:चे घर, चूल आणि मूल सांभाळून महिला चालवित असून, त्यांच्यातील निवडक महिलांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला.
मॉडेल कॉलनीतील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सेक्रेटरी सुशिला राठी, महाराष्ट्र गोसेवाआयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,सौ स्वाती मुंदडा, फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अमोल उंबरजे, योगेश बजाज, राहुल जगताप आदी उपस्थित होते.
सुशिला राठी म्हणाल्या, कोणतीही परिस्थिती आली तरी त्यासमोर महिला हार मानत नाहीत. सहनशीलतेने महिला कायम कार्यरत असतात. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांमध्ये महिला मोठया प्रमाणात कार्यरत आहेत,हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक महिलेमध्ये राजमाता जिजाऊंचे गुण यावे, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली
स्वाती मुंदडा यांनी आपल्या मनोगत मध्ये महिलांचे कार्य जागतिक पातळीवर कसे चालू राहील आणि समाजामध्ये स्त्रीचे महत्व जास्त आहे याबाबत विश्लेषण केले.
शेखर मुंदडा म्हणाले, समाजातील विविध क्षेत्रात काम करणा-या महिला आहेत, मात्र ठराविक महिलांनाच पुरस्कार दिले जातात. त्यामुळे तळागाळात काम करणा-या महिलांचा सन्मान महा एनजीओ फेडरेशन तर्फे करण्यात आला. समाजातील वंचित व गरजू घटकांसह गोमातेसाठी काम करणा-या महिलांच्या मागे आपण खंबीरपणे उभे रहायला हवे.
पुरस्काराला उत्तर देताना कै. सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता सपकाळ म्हणाल्या, राजमाता जिजाऊंनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. कोणत्याही स्त्रीकडे पाहताना आईपणाची दृष्टी ठेवण्याची शिकवण जिजाऊंनी दिली. माय-लेकरु आणि गाय-वासरु यांच्यासाठी आपण काम करतो. माईंचे म्हणजे सिंधूताईंचे काम पुढे सुरू ठेवण्याचे काम समाजाच्या पाठिंब्याने सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता बगाडे, अपूर्वा करवा, अक्षता जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.