- रोहन सुरवसे पाटील यांची मागणी; शासकीय योजनेचा लाभ न देता पैशांची लूट सुरु असल्याचा आरोप
पुणे : खेड्यापाड्यांतून उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची लूट सुरु आहे. शासकीय योजनांचा लाभ स्वतःच्या खिशात घालून शासनाचा व रुग्णांचा पैसा लुटणाऱ्या या रुग्णालयांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली. या मागणीचे निवेदन सुरवसे यांनी जिल्हाधिकारी, राज्याचे सचिव, आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे दिले आहे.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना व अन्य शासकीय योजना शहरातील अनेक खासगी व धर्मादाय रुग्णालयात आहेत. मात्र, रुग्णांना या योजनांचा लाभ ओळख असल्याशिवाय मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. बिल भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून, डॉक्टरांकडून रुग्णांची अडवणूक केली जाते. रुग्णालयात पेशंट आल्यावर पहिल्यांदा ५० हजारांची आगाऊ रक्कम भरून घेतली जाते. पैसे भरल्याशिवाय उपचार सुरु केले जात नाहीत. योजनांचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जाते.”
“या आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी रुग्णांकडून अनेकदा कागदपत्रे घेतली जातात. योजनेअंतर्गत उपचार केले जातात. मात्र, रुग्णाला योजनेत बसत नाही, असे सांगून लुबाडले जात आहे. उलट बिल कमी करून देण्याच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे वसूल केले जाते. अनेक रुग्णालये शासनाच्या योजनेचे, तसेच रुग्णांकडून असे दुहेरी पैसे घेतात. हे मोठे रॅकेट असून, दुहेरी लूटमार सुरु आहे. एखाद्याने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली, तर त्या रुग्णावर योग्य उपचार केले जात नाहीत. रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना डॉक्टर, रुग्णालय प्रशासन व कर्मचाऱ्यांकडून उर्मट व चुकीची भाषा वापरली जाते. उपचार थांबवले जातात. धर्मादाय आयुक्तालयातूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.”
“सर्वसामान्य जनतेची लूट होत असलेला हा सगळा प्रकार अतिशय गंभीर आहे. आज रुग्णालय प्रसाशन, व्यवस्थापन, डॉक्टरांच्या करोडोंच्या मालमत्ता तयार होत आहेत. या सगळ्यामध्ये रुग्णांना लुटून उभारलेला पैसा, शासकीय योजनेतील हडप केलेला पैसा आहे. याची शासनाने गंभीर दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी केली पाहिजे. ईडी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करावी, इतका हा मोठा व गंभीर विषय आहे. त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेऊन चौकशी करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या माध्यमातून रुग्णालये, धर्मादाय आयुक्तालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला.
धर्मादाय रुग्णालये किंवा शासकीय योजना असलेल्या खासगी रुग्णालयांतून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची होणारी लूट संतापजनक आहे. अतिशय संकटात सापडलेल्या अवस्थेत, त्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या या लोकांकडे माणुसकी राहिलेली नाही. रुग्णांचा व शासनाचा पैसा ही मंडळी लुटत आहेत. यांच्यावर वेळीच अंकुश लावण्याची गरज आहे.
- रोहन सुरवसे पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस