हस्तलिखितांचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षण साठी करार उपयुक्त
पुणे : भक्ती वेदांत संशोधन केंद्र आणि पीव्हीजीचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी.के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हस्तलिखितांचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षण साठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.
पुण्यातील इस्कॉन मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या भक्तिवेदांत संशोधन केंद्रात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी भक्ती वेदांत संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. एन. धुमाळ, शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ.जनार्दन चितोडे, संचालक संजय भोसले, सचिव भूषण चौधरी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, पुणे विद्यार्थी गृह (पी व्ही जी) महाविद्यालयाचे संचालक एस. पी. रेडेकर, प्रा. आर.जी. कडुस्कर, डॉ. एम.आर. तारंबळे, डॉ. के.जे. कुलकर्णी, डॉ. एस.टी गायकवाड यावेळी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा अध्यात्माकडे कल वाढविणे, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी विद्याशाखांचे सक्षमीकरण करणे. याशिवाय विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थी इंटर्नशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना भक्तिवेदांत संस्थेच्या विविध उपक्रमांवर काम करता यावे यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.
महाविद्यालयाचे इच्छुक विद्यार्थी भक्तिवेदांत संशोधन केंद्रासोबत सामाजिक जबाबदारी म्हणून काम करू शकतात. दोन्ही संस्था एकत्रितपणे प्रादेशिक भाषेत भगवत गीतेची व्याख्याने घेणार आहेत. विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स, उच्चशिक्षण आणि नोकरी साठी मार्गदर्शन करण्यासाठी सहयोग देखील या सामंजस्य कराराच्या माध्यमातून होणार आहे.
भारताचा समृद्ध इतिहास, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक वारसा जतन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी पुण्यातील इस्कॉन मंदिराच्या आवारात भक्तिवेदांत संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे संशोधन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. भक्तिवेदांत संशोधन केंद्र अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रतिष्ठीत विद्यापीठांच्या संशोधकांशी जागतिक स्तरावर जोडलेले आहे. पीव्हीजीचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी.के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शैक्षणिक आणि धर्मादाय संस्था आहे.