केबल सपोर्टेड पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर कामांसाठी 396 कोटी रुपयांच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 16 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर कौठळी पोंदकूलवाडी इंदापूर शहर, कालठण नंबर 2 ते शिरसोडी रस्ता प्रजिमा 191 येथील शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करण्यासाठी 395 कोटी 97 लक्ष 32 हजार अंदाजित खर्चाच्या बांधकामास राज्यसरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामुळे इंदापूर व करमाळा तालुका आणि परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.
इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन इंदापूर तालुक्यातील कौठळी पोंदकुलवाडी ते करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर अनुषंगिक कामांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कार्यवाही तातडीने पूर्ण करुन या कामांना प्रशासकीय मान्यता राज्यसरकारकडून देण्यात आली असून त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीमध्ये कौठळी पोंदकूलवाडी इंदापूर शहर, कालठण नंबर 2 ते शिरसोडी रस्ता प्रजिमा 191 येथील शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम या कामांचा समावेश आहे.