कोंढव्यातील कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द करण्यासाठी पुणे महापालिकेसमोर विविध संस्था, संघटनांचे आंदोलन
पुणे : “पाणी टंचाईची समस्या, पर्यावरणाचा ऱ्हास आणि गोवंशाची हत्या व अहिंसेला मारक ठरणारे कत्तलखाने बंद करा, अशी आग्रही मागणी शाकाहार कार्यकर्ते व सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी सोमवारी केली.
कोंढवा येथील कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध हिंदू, अहिंसा व प्राणीप्रेमी संस्था, संघटनांच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह जैन साधू परमपूज्य विरागसागरजी महाराज, प्रीतीसुधाजी महाराज, सकल हिंदू समाज संस्थेचे मिलिंद एकबोटे, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले, सकल जैन संघाचे डॉ. अशोक कुमार पगारिया, समस्त महाजनचे महाराष्ट्र समन्वयक रमेश ओसवाल, हिंदू रक्षक उज्ज्वला गौड यांच्यासह जैन, हिंदू समाजातील शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. गोमाता की जय, जय श्रीराम, बंद करा बंद करा कत्तलखाना बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “कत्तलखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरते. रोगी प्राण्यांना कापल्याने खाणाऱ्यांची प्रकृती बिघडते. तेथील रक्त, मांस व चामड्यामुळे वातावरण दूषित होते. तसेच असे कत्तलखाने खासगी लोकांच्या हातात गेले, तर त्यातून मिळणाऱ्या पैशांचा गैरवापर होऊन दहशतवादी लोकांना बळ मिळेल. ही परिस्थिती धोकादायक आहे. परदेशांत कत्तलखान्यांवर बंदी घातली जात असताना, आपल्याकडे हिंदुबहुल भागात असे कत्तलखाने सुरु होणे ही दुर्दैवाची व संतापाची गोष्ट आहे. गोहत्या व गोवंशाची हत्या करून दूध व अन्य पदार्थांची टंचाई निर्माण करण्यासह भारतीय संस्कृती व परंपरेचे हनन करत आहोत. हे वेळीच थांबायला हवे.”
मिलिंद एकबोटे म्हणाले, “पालिकेच्या वतीने कत्तलखान्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घातक आहे. मात्र, पैशाच्या हव्यासापायी अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जात आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मनात काही काळेबेरे आहे. कारण कत्तलखाना चालवणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा आम्हाला संशय आहे. हिंदू संस्कृती, गोमाता व गोवंश रक्षणासाठी कत्तलखाना व त्याचे खासगीकरण आम्ही कधीही होऊ देणार नाही.”
विराग सागरजी महाराज म्हणाले, “आपला देश कृषिप्रधान, दुधाची नदी वाहणारा होता. मात्र, आज येथे रक्ताचे पाट वाहताहेत. मुक्या प्राण्यांची निर्घृण हत्या केली जात आहे. अहिंसावादी आपल्या देशात प्राण्यांची होणारी हिंसा दुर्दैवी आहे. हे रोखण्यासाठी आणि संपूर्ण देश अहिंसेच्या मार्गावर चालावा, यासाठी प्रयत्न करत असताना आपण जिथे राहतो आहोत, त्या पुणे शहरात कत्तलखान्यांना प्रोत्साहन देण्याचे महापालिकेचे धोरण संतापजनक आहे. हा डाव आपणहाणून पडला पाहिजे.”
इतर अनेक हिंदू रक्षक व गोरक्षक संस्थांच्या प्रतिनिधीनी आपल्या भावना व्यक्त करत पुणे महानगर पालिकेने कत्तलखान्याच्या खासगीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तसेच हा प्रस्ताव मागे घेऊन कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द केले नाही, तर भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.