ऐनवेळी बैठक रद्द झाल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाबाबत संभ्रम
मुंबई-राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये देखील महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटप लवकरच जाहीर करू, थोडा धीर धरा अशा शब्दात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना सल्ला दिला आहे. तसेच महायुतीमध्ये जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारासाठी काम करा, असा सज्जड दम देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधील नेत्यांना दिला असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीमधील जागा वाटपचा तिढा अद्याप सुटलेला नसून त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत देखील दिसून आल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय आणि महत्त्वाच्या घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जागा वाटपावरून असलेल्या चर्चेचा परिणाम दिसून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला कमी जागा मिळत असल्याचे नेत्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्याचा परिणाम दिसून आला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा वाटप बाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असून थोडा धीर धरण्याचा सल्ला मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिला आहे. तसेच महायुतीमध्ये जो उमेदवार दिला जाईल, त्या उमेदवारांसाठी प्रत्येकाला काम करावे लागेल, असा दम देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीच्या जागा वाटपाबाबत आज दिल्लीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या दोन महत्त्वाच्या बैठका आज होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला. ऐनवेळी बैठक रद्द झाल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी आगामी दोन ते तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिली आहे.