धाराशिव- खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांना आपण स्वतः 10 कोटी रुपये पक्ष निधी दिला. एवढेच नाही तर निवडणुकीत ओमराजे यांच्या विजयासाठी स्वतःच्या खिशातले कोटीभर रुपये खर्च केले असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. ओमराजे निंबाळकर हा 100 बापाचा आहे. बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला अशी टीकाही तानाजी सावंत यांनी केली आहे. रविवारी दहिगावमधील सिना कोळेगाव प्रकल्पाची शेतकऱ्यांसह त्यांनी पाहणी केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलतांना तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही खालच्या पातळीवर टीका केली आहे. ”धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना दहा कोटींचा चेक दिला आणि लोकसभेत निवडून आणले. मात्र ओमराजे आपला बाप विसरले” अशी टीका तानाजी सावंत यांनी केली.
तसेच “ज्या तानाजी सावंतने तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटींचा चेकने निधी दिला. तुझ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तुला निवडून आणलं, तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला. असं कसं चालतं? तुम्हाला मान्य आहे का? आपल्या पोराने तू माझा बाप नाही ह्यो आपला बाप आहे, असं म्हटलं तर आवडेल का?”, असा सवाल तानाजी सावंत यांनी उपस्थित केला.
पुढे तानाजी सावंत म्हणाले, “ठेकेदारी, अधिकारी यांना शिव्या देणे, नंतर एकाने शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्याने तोडपाणी करायची हा धंदा निंबाळकर यांचा आहे. त्यांनी आता कोणत्याही बापाला समोर आणले तरी त्यांचा पराभव करू” अशी टीका ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली आहे. तसेच यावेळी बोलतांना त्यांनी निंबाळकर यांचा बेरोजगार खासदार असाही उल्लेख केला.
राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी या आधीही अशी वादग्रस्त वक्तव्यं केली आहे. अशी विधाने करणारे हे शिंदे गटाचे पहिलेच नेते नाहीत. त्या आधी अनेकांनी अशी वक्तव्यं केली आहेत. आमदार संतोष बांगर यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी विरोधकांबद्दल अपशब्द वापरल्याचं दिसून येत आहे. अशा वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील अडचणीत मात्र वाढ होत असते.