भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’, ‘लाडली बहना’ व ‘लेक लाडकी’ योजना कागदावरच.
मुंबई, दि. १ मार्च
भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते परंतु त्यांच्या या योजना फक्त जाहिरातबाजीसाठीच आहेत. महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन जगजाहीर आहे. भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. NCRB च्या अहवालात महिला अत्याचारात ४ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले असून दिल्ली व मुंबईसारख्या मोठ्या शहरातही महिला असुरक्षित आहेत, असा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, २०२२ मध्ये महिला अत्याचाराच्या ४ लाख ४५ हजार २५६ घटनांची नोंद झाली म्हणजे दरतासाला ५१ घटनांची नोंद झाली. महिला अपहरणाच्या घटनांची १९ टक्के नोंद झाली असून बलात्काराच्या ७ टक्के घटनांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीत २०२० मध्ये १० हजार ९३ घटना घडल्या होत्या त्यात वाढ होऊन २०२१ मध्ये १४ हजार २२७ झाल्या. महिला अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातही महिला अत्याचार वाढले असून बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून त्यानंतर पुणे आणि नागपूर शहराचा नंबर लागतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ड्रगचे साठे सापडत असून शहरापासून गाव खेड्यापर्यंत शाळा कॉलेजच्या बाहेर ड्रग्ज मिळत आहेत. तरुणाईला बर्बाद करण्याचे काम सुरु आहे.
जगात देशाचे नावलौकिक वाढवलेल्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह वर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, तो आजही मोकाट आहे. बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करुन त्यांच्या घरातील ७ लोकांची हत्या करण्यात आल्याप्रकरणी ११ जणांना जन्मठेप शिक्षा ठोठावली होती पण गुजरात सरकारने त्यांची सुटका केली व भाजपाच्या लोकांनी या गुन्हेगारांचा सत्कार केला नंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवले. महाराष्ट्रातही महिला अत्याचाराचे गंभीर आरोप असलेले काही लोक मंत्रिमंडळात आहेत, तर काहीजण आमदार खासदार आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर भाजपा कारवाई न करता त्यांना पाठीशी घालते. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे. पीडितेला संरक्षण दिले पाहिजे व अशी प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शासन केले पाहिजे, अशी मागणीही संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.