मुंबई-मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून राजकारण ढवळून काढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या संबधात जर असे मी बोललो असेत तर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत आहे. मी आई – बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो, असे ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे जरांगे सरकारविरोधात सपशेल बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मी शिवीगाळ केली नाही. ते आमरण उपोषण होते. झाला प्रकार अनावधानाने झाला. मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. पण त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मी असे बोलल्याचा दावा केला असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो.
मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आई-बहिणीवरून अपशब्द वापरले असे सांगितले गेले आणि या शब्दांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. परिणामी, मनोज जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.
आमच्यासाठी आई – बहिणींहून काहीच मोठे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालवणारे आहोत. त्यामुळे आमच्या तोंडातून आई-बहिणीविषयी चुकीचे शब्द गेले असतील तर मी 100 टक्के शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो, असे जरांगे म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या मुंबई स्थित सागर बंगल्यावर धडक देण्याचा निर्धार केला होता. पण सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर ते अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतले.
मनोज जरांगे यांच्या विधानाचे मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करत मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.