पुणे- चोरी करण्यासाठी एसबीआय बँकेंचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या विक्रमलाल इंद्रलाल शहाला पुणे पोलिसांनी पकडले आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२६/०२/२०२४ रोजी एसबीआय नियंत्रण कक्ष येथून हडपसर पोलीस स्टेशन येथे कॉल प्राप्त झाला की, हांडेवाडी हडपसर पुणे येथील एसबीआय एटीएम मध्ये कोणीतरी अज्ञात इसम कोणत्या तरी हत्याराने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असुन त्याच्या हालचाली संशयीत असल्याचे कळविले होते.
प्राप्त झालेल्या कॉलचे गांभिर्य लक्षात घेवून रात्रगस्त अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड, हडपसर पोलीस ठाणेकडील मार्शल व तपासपथक अंमलदार असे कॉलचे ठिकाणी रवाना झाले. पोलीस स्टेशनकडील स्टाफ घटनास्थळ जवळ गेले असता एक इसम एटीएम मधुन बाहेर पडून बाजुला असलेल्या अंधारामध्ये पळून जात असताना दिसला. पोलीस पथकाने पाठलाग करुन त्यास लाकडी दांडयाच्या टिकावासह ताब्यात घेतले. संशयीतास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विक्रमलाल इंद्रलाल शहा, वय २८ वर्षे, रा. सध्या जगताप चौक, रहाटणी रोड, पिंपळे सौदागर, पुणे. मुळगाव- भटगाव, तेहरी ग-हाल उत्तराखंड असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्याने त्याचे ताब्यात मिळून आलेले टिकावाने एसबीआय एटीएम फोडुन त्यामधील पैसे चोरी करण्यासाठी आला असल्याचे सांगीतले. एसबीआय बँकेचे एटीएम ची पाहणी केली असता एटीएम मशिनचा पत्रा उचकटल्याचे दिसून आले.
सदरबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३४९/२०२४ भा.दं. वि. कलम ४६१,३८०,५११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांचे सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलिस निरी. (गुन्हे), श्री. पंडीत रेजितवाड पुणे मागदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुनील कांबळे, वैभव भोसले, अतुल पंधरकर, अमित साखरे, यांचे पथकाने केलेली आहे.