मुंबई, 12 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या 1 लाखाहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यावेळी त्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील “कर्मयोगी भवन” य एकात्मिक संकुलाच्या उभारणीच्या पहिल्या टप्प्याचा कोनशीला समारंभ देखील झाला. हे संकुल कर्मयोगी अभियानाच्या विविध स्तंभांमध्ये सहयोग आणि सुसूत्रीकरण यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/1HHWQ.jpg)
जात, धर्म, पंथ, लिंग यापलीकडे जाऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनता घटकांना सेवा देण्याची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवर असते हे लक्षात ठेवून तशाच प्रकारचे सेवा कार्य नवनियुक्तांकडून घडावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली. प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याच्या 17व्या टप्प्यात हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बल – सीआरपीएफ ग्रुप सेंटर येथे गडकरी यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री बोलत होते. यावेळी उपस्थितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केलेल्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय निधी निर्वाह संघटना, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सेवा दल त्याचप्रमाणे आरोग्य विभाग आणि भारतीय अन्न महामंडळ अशा विविध संस्था आणि विभागात झालेल्या नियुक्त्यांची नियुक्ती पत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात एकूण 119 जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/2GYK1.jpg)
पुण्याजवळ तळेगाव इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रावर आज आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकंदर 191 जणांना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सरकारी नोकरीची नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री राणे यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत प्रामाणिकपणे आणि शिस्तबध्द पद्धतीने काम करण्याचे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/3QW69.jpg)
आज नियुक्ती पत्र मिळालेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल, सीमा रस्ते संघटना, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभाग, रेल्वे, आदिवासी विकास विभाग आणि भारतीय अन्न महामंडळ अशा विविध सरकारी विभागांमधून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/4F4V8.jpg)