मुंबई-अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण नेते गेले तरीही कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता पक्षासोबत राहतात त्यामुळे चिंतेचे कारण नाही, आम्ही लढू पुढील रणनीती आखू, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या राजीनामा सत्रानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोकराव चव्हाण यांच्या डोक्यात काही चाललंय हे माहित नव्हते. अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्षाला सोडून जातील असे आम्हाला कधीही वाटले नाही. जागावाटपाबाबत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांना मविआत महत्त्वाचे स्थान होते. मानाचे स्थान दिलेले होते. कॉंग्रेसने त्यांना सातत्याने सर्वोच्च पद दिलेली आहेत. पण त्यांनी असा घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना धक्कादायक आहे.
भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्याची दिशा निश्चित आहे. भाजपकडून सातत्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. ते आज आमच्यासोबत देखील झाले आहे. आम्ही कॉंग्रेसमधून आमच्या सर्वांचा आढावा घेणार आहोत.भाजपसोबत जाताना अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. कॉंग्रेसमधून काही लोक जाणार अशा वावड्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोणीही त्यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे नेते गेले तरी मतदार, कार्यकर्ते व जनता त्यांच्यासोबत जाणार नाही, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
अशोक चव्हाण यांचा निर्णय दुर्दैवी निर्णय घेतला. त्याची मी खंत व्यक्त करणार आहे. त्यांच्यावर कोणता दबाव होता, त्यांनी असा निर्णय का घेतला, हे अशोकराव चव्हाणच सांगतील असे पृथ्वीराज म्हणाले. पण भाजपची रणनीती आहे की, जनतेचे समर्थन मिळत नसेल तर विपक्ष तोडा आणि सत्ता मिळवा, असे सुरू आहे. असेही पृथ्वीराज म्हणाले.