मुंबई– खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक फोटो ट्विट केला आहे. खंडणी, अपहरणसारख्या गुन्ह्यांत आरोपी असलेले लाल सिंग यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा हा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणे कठीण झाले आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.संजय राऊत हे सध्या सातत्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे काही आरोपींसोबत फोटो शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आरोपी, गुंडांसोबतचे फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे. गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य असे म्हणत ते राज्य सरकारवर टीका करत आहेत.
संजय राऊत यांचे ट्विट काय?
पैचान कौन? मा. गृहमंत्री महोदय, हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी. टीम मिंधे चे खास मेंबर..काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य! अशा आशयाचे ट्विट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावर बोलतांना आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ”तो गुंडा नाही महागुंडा आहे. असे छोटे मोठे गुंडे त्यांच्या पक्षात बसलेले आहेत. गेल्या 10 दिवसात त्यांच्यात पक्षात महाराष्ट्रातून सामील झालेल्या गुंडांचे फोटो समोर आणले. विशेषतः मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव यांच्यासोबतच ते फोटो होते. हे सरकार आणि या राज्यातील मुख्यमंत्री काय करत आहेत?”, अशी टीका राऊतांनी केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणूक घ्या असेही राऊत म्हणाले.
पोलिस आयुक्त तर भाजपचे कार्यकर्ते
यावेळी संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना देखील खडेबोल सुनावले आहेत. ”मुख्यमंत्री, गृहमंत्री गुंडांचे समर्थन करतात. गुंडांची परेड काढणे हा केवळ दिखावा आहे. हल्ला करणाऱ्यांची परेड का काढली नाही? तसेच मुंबई पोलिसांनी ही नौटंकी बंद करावी. हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड काढा तरच तुम्ही पोलिस आयुक्त नाही तर भाजपचे कार्यकर्ते”, असे म्हणत राऊतांनी मुंबई पोलिसांवर निशाणा साधला.संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ”मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवणार ते फेकूचंद आहेत. चोरमंडळाचे ते सरदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आसपास गुंड नव्हे विचारवंत असावे लागतात. अभ्यास असावा लागतो. गुंडांसोबत बैठकघेऊन बुद्धीचे दार उघडत नाहीत. आजच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आरोपींची बैठक होत असते”, असे राऊत म्हणाले.
राज्यात सुरू असलेल्या या गुंडाराजच्या विरुद्ध काय पावले उचलावीत यासाठी महाविकास आघडीमध्ये चर्चा सुरू असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू असून लवकर याबाबत आम्ही भूमिका जाहीर करू, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.