पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.
काँग्रेस पक्षात गेली पंचेचाळीस वर्षे विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या मोहन जोशी यांनी पार पाडल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आहेत. अलीकडेच तेलंगणमधील विधानसभा निवडणुकीत निरिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्यावर सोपविलेल्या आठही मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले. तसेच कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यातील निवडणुकीत मोहन जोशी यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग व्हावा याकरिता पक्षाने महाराष्ट्र पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.