खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसोबतचा आणखी एक फोटो ट्विट केला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांचे ट्विट काय?
”गृहमंत्री देवेंद्र जी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत! हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा! असे लिहीत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
राज्यातील गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर एफआयआर दाखल करावा. पुराव्यांची गरज असल्यास आम्ही पुरावे देऊ अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दररोज मुख्यमंत्री शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येत आहेत हे फोटो गृहमंत्र्यांना दिसत नाहीत का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.राज्यात घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे संजय राऊत हे सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले हे राज्य असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे