: पुणे नगर वाचन मंदिराच्या १७६ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम व पुरस्कार वितरण
पुणे : केवळ एखादी वास्तू, काही सभासद आणि भरपूर पुस्तके असा प्रकार म्हणजे वाचनालय, असे नाही. तर वाचनालये आपल्याला जगण्याचे मूल्य देतात. वाचनालये ही ज्ञान सुरक्षित ठेवण्याच्या सांस्कृतिक वाहिन्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व साहित्यिक भारत सासणे यांनी केले.
पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या १७६ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, सहकार्यवाह डॉ. प्रसाद जोशी, रोहित जोगळेकर, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री अरविंद रानडे, रवींद्र चौधरी, केदार पटवर्धन, दीपक पाथरकर, संकेत देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, प्रशांत टिकार, राजीव मराठे, केतनकुमार पाटील, विनायक माने, संगीता पुराणिक, गौरी कुलकर्णी, शुभांगी केळकर, स्वाती ताडफळे, गायत्री सावंत आदी उपस्थित होते.
कै. आर.एल. नगरकर प्रतिष्ठान पुरस्कृत डॉ. श्री. व्यं. केतकर वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार श्यामसुंदर जोशी, ऍड. शरद तपस्वी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार चैत्राम पवार यांना आणि कवी ह.स. गोखले संत साहित्य विषयक ग्रंथलेखन पुरस्कार विद्याधर ताठे यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, रोप आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
भारत सासणे म्हणाले, कोणत्याही देशाला गुलाम करायचे झाले तर तेथील वाचनालयांवर हल्ला केला जातो, हे इतिहास आपल्याला सांगतो. त्यामुळे नालंदा सारखी अनेक उदाहरणे समोर आहेत. आज महत्वाच्या आणि प्रकाशित झालेल्या पुस्तकांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यावर चर्चा होत नाही, वाचक वाचत नाहीत आणि ती पुस्तके विस्मरणात जातात. समाजात पुस्तकांबद्दल अनास्था निर्माण झाली आहे. समाज मनोरंजनाकडे जास्त वळला असून वैचारिकतेपासून समाज दूर जात आहे.
ते पुढे म्हणाले, तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. हे आपल्याला आपल्या कुटुंबातून जाणवते. ज्यांच्यासाठी आपण लिहितो, ती पिढी आपल्यापासून दूर गेली आहे. यामुळे अरसिकता, अडाणीपणा यातून निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. बालकुमार साहित्य हा आपला वारसा आहे, मात्र त्यात जुनी मराठी भाषा आहे. त्यामुळे बालकुमार साहित्यातील लहान मुलांना काय द्यावे, हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे.
श्यामसुंदर जोशी म्हणाले, ग्रंथ या शब्दाची महती आपल्याला समजलेली नाही. वाचन करणाऱ्यांमध्ये अक्षर वाचन करणारे खूप आहेत. अक्षर वाचन म्हणजे वाचन नाही. आपल्याला माणूस वाचता आला पाहिजे. राजकीय आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींचा स्वभाव वाचता येणे म्हणजे वाचन होय. जपान मध्ये सगळ्यात जास्त पुस्तके वाचली जातात, असेही त्यांनी सांगितले.
विद्याधर ताठे म्हणाले, संतसाहित्य हे मराठी साहित्याचे सत्व आहे. तब्बल १२ व्या शतकाच्या आधीपासून संतासहित्याचा प्रवास सुरु होतो. महाराष्ट्र ही शूर वीरांसह संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात जेवढे संत झाले तेवढे कोठेही झाले नाहीत, हे आपल्याला समजले नसून हे आपले करंटेपण आहे. घरातील केवळ एकाने संत म्हणून नाही, तर आपल्याकडे संतपरंपरेत संपूर्ण कुटुंबाने सहभाग घेत अलौकिक कार्य केले आहे, हे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वैशिष्ट्य आहे.
आदर्श सामाजेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले चैत्राम पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले व पुणे नगर वाचन मंदिर संस्थेने दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशन या प्रकल्पाद्वारे वाचन संस्कृती संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा अंगिकार केला असे विचार अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
कार्यवाह सुवर्णा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती ताडफळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. रोहित जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संकेत देशपांडे यांनी आभार मानले.