मुंबई-शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नवे नाव दिल्याचे वृत्त आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बुधवारी निवडणूक आयोगाला पक्षासाठी 3 नावांचा प्रस्ताव पाठवला होता. यात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ या 3 नावांचा समावेश होता. तर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला आता ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ असे नवीन नाव दिले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात नुकताच निर्णय दिला आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणूकीपर्यंत म्हणजे 27 फेब्रुवारी पर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे नावासाठी अर्ज करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षचिन्हाबाबत होऊ शकतो निर्णय
तर निवडणूक आयोगाने आज केवळ पक्षाच्या नावासंदर्भात निर्णय घेतला आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाला चिन्हाची गरज भासत नाही. त्यामुळे पक्षचिन्हाचा निर्णय आगामी काळात घेतला जाणार आहे.
नाव सूचविण्यासाठी होता 4 वाजेचा वेळ
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3 नावे पाठवण्याची मुदत दिली होती. या ठराविक मुदतीत या गटाला नावे पाठवण्यात अपयश आले असते तर या गटाच्या नेत्यांवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आली असती.
निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली होती. तसेच या गटाला घड्याळ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्हही दिले होते. आयोगाने या प्रकरणी तब्बल 6 महिन्यांत 10 सुनावणी घेतल्या. त्यानंतर आपला निर्णय दिला. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.