पुणे, दि ५: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता देण्यात आला असून त्याबाबत सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
क्रीडा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह देण्यात आला आहे. हा अहवाल प्राथमिक असून अंतिम नाही. याबाबत ८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सूचना व हरकती सादर करावयाच्या आहेत. संकेतस्थळावरील विहीत नमुन्यात सूचना व हरकती सादर कराव्या, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
००००