पुणे:
पुणेमेट्रो ने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर #चाचणी पूर्ण केली. आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ट्रेन ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानक येथे पोहचली (सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर ८५३ मी, बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर १ किमी आणि मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर १.४८ किमी). या चाचणीसाठी १ तास वेळ लागला. या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किमी इतका ठेवण्यात आला होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडली. एकूण ३.३४ किमी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या ३. ६४ किलोमीटर अंतरावर भुयारी मेट्रोची चाचणी सोमवारी यशस्वी झाली. मुठा नदीच्या पात्राखालून सुमारे १३ मीटरवरून पहिल्यांदाच मेट्रो धावली.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, पुणे मेट्रो प्रकल्पाचे संचालक श्री. अतुल गाडगीळ (कार्य), श्री. विनोदकुमार अग्रवाल (संचलन व प्रणाली), कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (जनसंपर्क व प्रशासन), श्री. राजेश द्विवेदी (संचलन, सुरक्षा व देखभाल) तसेच पुणे मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानके
– शिवाजीनगर न्यायालय – जमिनीपासून ३३ मीटर खोल
– बुधवार पेठ स्थानक – ३० मीटर खोल
– महात्मा फुले मंडई स्थानक – २६ मीटर खोल
– स्वारगेट स्थानक – २९ मीटर खोल आहे.
– भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी मुठा, मुळा आणि पवना या ३ टनेल बोअरींग मशीनचा (टीबीएम) वापर करण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचे काम २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरु करण्यात आले आणि प्रत्येकी ६ किलोमीटर अंतराच्या दोन भुयारी मेट्रोचे खोदकाम काम ४ जून २०२२ रोजी पूर्ण झाले.
– भूमिगत मेट्रोमुळे दोन महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे. पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेट गणपती,रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडियम आदी ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.