पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१ व्यंगचित्रकारांचा सहभाग
पुणे, (ता.०४): जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२६’ यंदा ७, ८ आणि ९ मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात रंगणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणारा हा महोत्सव सर्वांसाठी विनाशुल्क खुला असून, व्यंगचित्रप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
यंदाच्या महोत्सवात जगभरातील ४२ देशांतील सुमारे १५० कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच भारतातील ६२ आणि महाराष्ट्रातील ७७ अशा एकूण २९१ व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन येथे पाहायला मिळणार आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय विषयांवर आधारित व्यंगचित्रांची अनोखी मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, पुणे महापालिका विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, नगरसेवक पुणे महापालिका , सदस्य स्थायी समिती संदीप बेलदरे,शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, सामाजिक कार्यकर्ते शेठ नानजीभाई ठक्कर ठाणावाला, उद्योजक आकाश गायकवाड आणि ॲड. दिलीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता बालगंधर्व कलादालन होणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात व्यंगचित्र प्रात्यक्षिके, कार्यशाळा, मुलाखती, सन्मान सोहळा आणि संवादपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण, जागतिक युद्ध, जागतिक राजकारण, शिक्षण, आरोग्य, दुष्काळ, अतिवृष्टी आणि समाजस्वास्थ्य यांसारख्या समकालीन विषयांवर जगभरातील नामवंत व्यंगचित्रकारांची प्रभावी कलाकृती रसिकांसमोर मांडल्या जाणार आहेत.
महोत्सवाचे आयोजक धनराज गरड, मुख्य समन्वयक किशोर शितोळे आणि कार्टुनिस्टस् कम्बाईनचे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

